---Advertisement---

ज्येष्ठ कादंबरीकार आणि साहित्यिक सुप्रिया अय्यर यांचे निधन

by team
---Advertisement---

नागपूर : ज्येष्ठ कादंबरीकार व अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर (वय ७४) यांचे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे उपचार सुरू होते. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

अय्यर यांनी 12 वर्षांपूर्वी अभिव्यक्ती संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले आणि संस्थेला नावारुपात आणण्यात मोठे योगदान दिले. आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना लिहिते केले. 2022 मधील साहित्य संमेलनासह त्यांनी नागपुरात विविध साहित्यिक आयोजने यशस्वी केली. अभिव्यक्तीच्या माध्यमातून विविध साहित्यिक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले. मेडिको सोशल वर्कर म्हणून काम केलेल्या अय्यर या राज्य शासनाच्या एड्‌स नियंत्रण सोसायटीवर अनेक वर्ष कार्यरत होत्या. त्या राज्य शासनाच्या वाङ्‌मय पुरस्कार समिती तसेच राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माजी सदस्या होत्या.

अय्यर यांच्या ‘ शुद्ध वेदनांची गाणी, कन्याकोलम आणि अजन्मा या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या. त्याचप्रमाणे, अय्यर यांनी ललित लेखनासह आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका, कथा व लेख लिहिले आहेत.

अय्यर यांचे खुळी बोगनवेल, सोन्याचे दरवाजे आणि किनखापी मोर हे कथासंग्रह, ‘सनान रे बोंद्र्या’ हा वऱ्हाडी कथा संग्रह,“चांदणचुरा’ व ‘काही शुभ्र कमळे’ हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध होते. त्यांच्या ‘खुळी बोगनवेल’, ‘किनखापी मोर’ या कथासंग्रहांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार मिळाले होते. याशिवाय, अन्य संस्थांचे विविध पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते.

त्यांची अंत्ययात्रा सकाळी11 वाजता शंकरनगर येथील निवासस्थानाहून निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात प्रियदर्शन व हर्षवर्धन ही दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment