जेरुसलेम : मागील दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमासमधील रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. इस्रायली सैन्य गाझावर सातत्याने हवाई हल्ले करीत आहे. इस्रायलने हमासच्या दोन म्होरक्यांचा खात्मा केला. तरी दहशतवाद्यांनी इसायली सैन्यासमोर पराभव स्वीकारला नाही. अशा परिस्थितीत आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुप्तचर संघटना मोसादच्या संचालकांना कतारमध्ये युद्धबंदीच्या वाटाघाटीसाठी जाण्याची परवानगी दिली आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धासंदर्भात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धबंदी चर्चेत प्रगती झाल्याचे संकेत इस्रायलकडून मिळत आहेत. पंतप्रधान नेतन्याहू यांनी ‘मोसाद’ संचालकांना युद्धबंदीच्या पुढील टप्प्यातील चर्चेसाठी पुढे येण्याची परवानगी दिली. इस्रायल हमास युद्ध थांबवण्याच्या दिशेने नेतान्याहू यांचे हे पाऊल आतापर्यंतचे सर्वांत मोठे पाऊल मानले जात आहे. टप्प्याटप्प्याने युद्धबंदीची चर्चा सुरू करण्याचे संकेत नेतान्याहू यांनी दिले आहेत.
मात्र, आम्ही फक्त पहिल्या टप्प्यातील चर्चेसाठी वचनबद्ध आहोत, एका आठवड्याच्या लढाईच्या विरामाच्या मोबदल्यात ओलिसांची अंशतः सुटका करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी हमासकडे केली. मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातून इस्रायली सैन्याची संपूर्ण माघार घेण्याच्या आग्रहावर हमास ठाम आहे; परंतु नेतान्याहू यांनी गाझामध्ये हमासची लढाई करण्याची क्षमताच नष्ट करणार असल्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी, गुप्तचर संघटना मोसादच्या संचालकांना कतारमध्ये पाठवण्यास नेतान्याहू यांनी परवानगी दिली. मोसादचे संचालक डेव्हिड बार्निया इसायल आणि हमास यांच्यातील चर्चा कतारची राजधानी दोहा येथे केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.