Stock Market: जानेवारी महिन्यातही शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन सुरूच आहे. आतापर्यंत एफपीआयनी शेअर बाजारातून २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. त्यामुळे शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली आहे.
गेल्या ४ वर्षांपासून म्हणजेच २०२२ ते २०२५ पर्यंत जानेवारी महिन्यात शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन सुरूच आहे. २०२१ मध्ये जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात पैसे गुंतवले होते.
जानेवारीमध्ये इतके पैसे काढले
या महिन्यात आतापर्यंत FPI ने भारतीय शेअर बाजारातून २२,१९४ कोटी रुपये काढले आहेत. कंपन्यांच्या कमकुवत तिमाही निकालांची शक्यता, डॉलर मजबूत होणे आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात टॅरिफ वॉर तीव्र होण्याची शक्यता यामुळे FPI विक्रेते राहिले आहेत. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला, FPI ने भारतीय शेअर बाजारात १५,४४६ कोटी रुपये गुंतवले होते. जागतिक आणि देशांतर्गत आघाडीवरील अडथळ्यांदरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधील गुंतवणूक कमी केली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार, या महिन्यात (१० जानेवारीपर्यंत) आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर्समधून २२,१९४ कोटी रुपये काढले आहेत. २ जानेवारी वगळता सर्व ट्रेडिंग सत्रांमध्ये FPI निव्वळ विक्रेते राहिले आहेत.
काय आहे चार वर्षाचा डेटा ?
२०२२ पासून एक विशेष ट्रेंड दिसून येत आहे. म्हणजेच जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजार विक्री करताना दिसत आहे. २०२२ सालच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून ३३,३०३ कोटी रुपये काढले होते. त्यानंतर २०२३ मध्ये हा आकडा २८,८५२ कोटी रुपये दिसून आला. २०२४ मध्येही हाच ट्रेंड कायम राहिला आणि शेअर बाजारातून २५,७४४ कोटी रुपये काढले गेले. चालू वर्षाबद्दल बोलायचे झाले तर जानेवारी महिन्याचा अर्धा भागही उलटला नाही आणि एफपीआयने २२,१९४ कोटी रुपये काढले आहेत. यावेळी परदेशी गुंतवणूकदार २०२२ सालचा आकडा मोडून ३५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.