---Advertisement---
Kolkata: गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी आरजी कार रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला. कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुन्ह्याच्या ठिकाणाहून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे संजय रॉय याला अटक केली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. केंद्रीय तपास यंत्रणेनेही संजय रॉय याला त्यांच्या आरोपपत्रात मुख्य आरोपी मानले आणि न्यायालयाकडून त्याला मृत्युदंडाची मागणी केली होती.
दरम्यान आज कोलकाता येथील सियालदाह येथील सत्र न्यायालयाने आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि खून प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले आहे.
न्यायाधीश अनिर्बान दास यांनी संजय रॉय यांना भारतीय दंड संहितेच्या (बीएनएस) कलम ६४ (अत्याचाराची शिक्षा), ६६ (मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शिक्षा) आणि १०३ (खून) अंतर्गत दोषी ठरवले. सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी खटला सुरू झाल्यानंतर ५७ दिवसांनी निकाल दिला.
संजय याने न्यायाधीशांना विचारले की, ‘मला गुंतवणाऱ्या इतर लोकांना का सोडले जात आहे?’ यावर उत्तर देताना न्यायाधीश अनिर्बान दास म्हणाले की, ‘मी सर्व पुरावे बारकाईने तपासले आहेत आणि साक्षीदारांचे ऐकले आहेत, खटल्यादरम्यान युक्तिवादही ऐकले आहेत. हे सर्व पाहिल्यानंतर, तू दोषी आढळले आहे. त्यामुळे तुला शिक्षा झालीच पाहिजे.’ न्यायालय २० जानेवारी रोजी संजय रॉय याची शिक्षा जाहीर करणार आहे. तोपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आणि कोलकातामध्ये बराच काळ निषेध करण्यात आला, ज्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी सहभागी होते.