जळगाव । यावल तालुक्यातील अंजाळे ते वाघळूद गावादरम्यान पाटचारीजवळ कार आणि मिनिडोअरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालय तसेच भुसावळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यावल-भुसावळ रस्त्यावर अंजाळे गावाहून यावलच्या दिशेने येताना वाघळूद गावाजवळील पाटचारी येथे हा अपघात झाला. यावलहून भुसावळकडे जाणारी कार (एमएच.१९-इजी.२७८६) आणि भुसावळहून यावलकडे येणारी मिनिडोअर (एमएच.१९-जे.८५७३) यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडकेत दोन्ही वाहने मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली असून, प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा : पृथ्वीच्या गतीचा थक्क करणारा व्हिडीओ व्हायरल! आभाळ स्थिर, तर पर्वत-घरं फिरताना दिसली
जखमींची नावे
या अपघातात नरेंद्र प्रेमचंद पाटील, रागिनी नरेंद्र पाटील, माधुरी गोकुळ पाटील, भावना नंदकिशोर पाटील (सर्व रा. सावखेडासिम, ता. यावल), तसेच दीपक पाटील व शिवांशू पाटील (दोघे रा. यावल) आणि मिनिडोअर चालक असे एकूण सात जण जखमी झाले आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेत जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी भुसावळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून, अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.