पाचोरा (विजय बाविस्कर ) : पाचोरा शहरात भगवान विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः भव्य मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले.
भगवान विश्वकर्मा हे स्थापत्य आणि यांत्रिकी क्षेत्रातील दैवत मानले जातात. कारागीर, तंत्रज्ञ, इंजिनियर, वास्तुविशारद आणि यंत्रसामग्री व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या नागरिकांसाठी ही जयंती विशेष महत्त्वाची असते. या निमित्ताने शहरातील विविध प्रतिष्ठानांमध्ये भगवान विश्वकर्मांची विधिवत पूजा करण्यात आली.
जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेली भव्य मिरवणूक हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. मिरवणुकीत विविध आकर्षक रथ सहभागी झाले होते. भक्तगण पारंपरिक पोशाख परिधान करून जयघोष करत पुढे सरकत होते. तसेच, मिरवणुकीदरम्यान धार्मिक गीते, भजन आणि आरत्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. आयोजकांनी जयंती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. संपूर्ण मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडली. शहरातील हा भक्तिपूर्ण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र आले होते. संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि मंगलमय झाल्याचे चित्र दिसून आले.