मुंबई : श्रीरामललाचे मुख्य पुजारी आणि श्रीरामजन्मभूमी आंदोलनाचे अर्ध्वयू आचार्य सत्येंद्रदास यांचे बुधवार, दि. १२ फेब्रुवारी सकाळी ब्रेन हॅमरेजने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्रीरामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्रदास महाराज यांचे निधन झाले आहे. त्यांनी माघ पौर्णिमेच्या पवित्र दिवशी, सकाळी ७ वाजता त्यांनी पीजीआय लखनऊ येथे अखेरचा श्वास घेतला. ते १९९३ पासून श्रीरामललाची सेवा करत होते. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय आणि मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित इतर लोकांनी मुख्य पुजाऱ्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आचार्य सत्येंद्रदास यांना ३ फेब्रुवारी रोजी पीजीआय लखनऊ येथील न्यूरॉलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते, त्यावेळीही त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यापूर्वी ते उच्च मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकाराने आजारी होतें, अशी माहिती रूग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
२० मे १९४५ रोजी उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर जिल्ह्यात जन्मलेले सत्येंद्र दास हे श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख व्यक्ती होते.. १९५८ मध्ये सत्येंद्र दास यांनी घर सोडले आणि संन्यास घेतला आणि रामजन्मभूमीचे तत्कालीन पुजारी अभिराम दास यांचे शिष्य बनले. १९९२ मध्ये सत्येंद्र दास यांची श्रीरामललाचे मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाली होती.
संत समाजाची कधीही भरून न येणारी हानी
श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्रदास जी यांचे निधन ही संत समाजाची आणि भाविकांची कधीही भरून न येणारी हानी आहे. राम भक्तांमध्ये श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेले आचार्य जी सदैव देवाच्या सेवेसाठी आणि भक्तांच्या मार्गदर्शनासाठी समर्पित होते. श्री रामजन्मभूमी आंदोलनात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. प्रभू श्रीराम त्यांच्या पुण्य आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल परिवारातील सदस्यांना व अनुयायांना बळ देवो.
– अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
आध्यात्मिक जगताची हानी
प्रभू श्रीरामाचे परम भक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या धामचे मुख्य पुजारी आचार्य श्री सत्येंद्रदास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आणि आध्यात्मिक जगताची कधीही भरून न येणारी हानी आहे. दिवंगत पुण्यात्म्यास प्रभू श्रीरामाच्या चरणी स्थान मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
सनातन धर्माच्या उन्नतीसाठी समर्पित जीवन
आचार्य सत्येंद्र दास जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आणि हृदयद्रावक आहे. त्यांचे जीवन श्री रामललाची भक्ती, आध्यात्मिक सेवा आणि सनातन धर्माच्या उन्नतीसाठी समर्पित होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण अध्यात्मिक जगाचे खूप मोठे नुकसान झाले आहे, ज्याची भरपाई करणे अशक्य आहे. श्री रामजन्मभूमी मंदिराचे देवत्व आणि धार्मिक परंपरा समृद्ध करण्यात त्यांची भूमिका अविस्मरणीय राहील. त्यांच्या पुण्यवान आत्म्यास आपल्या चरणी स्थान देवो आणि या कठीण प्रसंगी आपल्या भक्तांना व अनुयायांना धीर व शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र