नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर चेंगराचेंगरी झाल्याने १८ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये ९ महिला, ५ मुले आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी हजारो भाविक स्टेशनवर जमले होते. ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अचानक गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली.
दुर्घटनेचे स्वरूप
शनिवारी रात्री प्रयागराज महाकुंभाला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दी झाली होती. रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १४ वर प्रवासी त्यांच्या गाड्यांमध्ये चढण्यासाठी धावत होते. त्याचवेळी, एस्केलेटरवरील धक्काबुक्कीमुळे काही प्रवासी खाली पडले आणि त्यांना चिरडले गेले. परिणामी, चेंगराचेंगरीमुळे अनेकांना गुदमरायला लागले आणि मृतांची संख्या वाढली.
हेही वाचा : Crime News: जालन्याची मोनिका ठरली ‘लव्ह जिहाद’ची बळी; शेतात नेत इरफानने केले असे की, अंगावर येईल काटा
नेमकी चेंगराचेंगरी कशी झाली?
रेल्वे स्टेशनवर तीन महत्त्वाच्या गाड्या प्रयागराजला जाण्यासाठी होत्या:
- प्रयागराज स्पेशल ट्रेन
- भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस
- स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस
भुवनेश्वर राजधानी आणि स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस या गाड्या उशिराने धावत होत्या. प्रवासी आधीच प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचानक घोषणा करण्यात आली की भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर उभी आहे. हे ऐकताच, प्लॅटफॉर्म १४ वर असलेल्या प्रवाशांनी १६ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली. यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आणि चेंगराचेंगरी झाली.
दुर्घटनेची मुख्य कारणे
- अचानक झालेल्या घोषणांमुळे प्रवाशांचा गोंधळ: प्रवाशांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने त्यांचा प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी गोंधळ उडाला.
- गर्दीवरील नियंत्रणाचा अभाव: कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती, परंतु स्टेशन प्रशासनाने कोणताही नियंत्रण कक्ष उभारला नव्हता.
- तिकीट काउंटरवरील मोठी गर्दी: बरेच प्रवासी तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे होते. अचानक ट्रेन आल्याची घोषणा झाल्यावर अनेकजण तिकीट न काढताच धावत गेले.
- गर्दीचा योग्य अंदाज न घेणे: संध्याकाळी ७ वाजल्यापासूनच स्टेशनवर गर्दी वाढू लागली होती, मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
प्रत्यक्षदर्शींचे अनुभव
प्रयागराजला जाणारे एका प्रवाशाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझ्याकडे पुरुषोत्तम एक्सप्रेसचे स्लीपर तिकीट होते. पण इतकी गर्दी होती की कन्फर्म तिकीट असलेले लोकही डब्यात प्रवेश करू शकले नाहीत. इतकी धक्काबुक्की झाली की आम्ही गर्दीतून कसेबसे बाहेर पडण्यात यशस्वी झालो. तर प्रत्यक्षदर्शी धर्मेंद्र सिंह म्हणाले की, मीही प्रयागराजला जात होतो. दोन गाड्या आधीच उशिराने धावत होत्या, काही रद्द करण्यात आल्या. त्यामुळे स्टेशनवर मोठी गर्दी होती. आयुष्यात पहिल्यांदाच मी या स्टेशनवर इतकी गर्दी पाहिली. मी स्वतः सहा-सात महिलांना स्ट्रेचरवरून नेताना पाहिले.
जखमींवर उपचार सुरू
रेल्वे पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी जखमींना एलएनजेपी आणि लेडी हार्डिंग रुग्णालयात दाखल केले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना आणि माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची प्रकृती जाणून घेतली.