मुंबई : तारीख होती १४ फेब्रुवारी २०२५… ‘व्हॅलेंटाईन डे’ असतानाही अनेकांची गर्दी दिसली ती चित्रपटगृहांत.. छावा सिनेमा पाहण्यासाठी आलेल्या तमाम हिंदू बांधवांची. या सिनेमाने फक्त ज्येष्ठच नाही तर आजच्या तरुणाईच्या मनातही मोठं स्थान निर्माण केलंय. छत्रपती संभाजी महाराजांचा आणि खासकरून औरंग्याचा जो इतिहास इतकी वर्ष लपवून ठेवण्याचा प्रयत्न झाला. तो या एका चित्रपटामुळे एका क्षणात साऱ्या जगासमोर आला. मात्र केवळ व्होटबँकसाठी एका विशिष्ट समुदायाचे लांगुलचालन करणाऱ्या काही ब्रिगेडी विचारांच्या लोकांनी हा सिनेमा बंद पाडण्याची भूमिका घेतली आहे आणि चित्रपटातून कशाप्रकारे खोटा इतिहास सांगाण्याचा प्रयत्न होतोय याचाच प्रचार हे लोक आता करू लागलेत. छावा सिनेमा ब्रिगेडींचा अजेंडा उध्वस्त करणारा चित्रपट ठरलाय, यात शंका नाही. तो कसा वाचा सविस्तर.
छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज, दोघांचेही नाव प्रत्येक हिंदू अभिमानाने घेतो. त्यांचे शौर्य, बुद्धिमत्ता, पराक्रम आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्यांचे असलेले योगदान, हे इतिहासात अजरामर आहे. ‘छावा’ चित्रपटामुळे भारतात गेली अनेक वर्षे मुघलांचे उदात्तीकरण करणाऱ्या विचारसरणीचे खोटे रूप उघड झालेय. या चित्रपटाने औरंगजेबाचा क्रूर, हिंदूद्वेषी चेहरा संपूर्ण जगासमोर आणला. हे पाहून इतकी वर्ष आपण चालवलेला अजेंडा आता धुळीस मिसळणार हे पाहून राजकीय हेतूने काही दाढी कुरवाळू लोकांनी औरंगजेबाचा बचाव करण्यासाठी नवा खोटा प्रचार सुरू केला आहे. त्यांनी जाणीवपूर्वक संभाजी महाराजांच्या हत्येबाबत मनुस्मृती आणि ब्राह्मणांचे नाव जोडून दिशाभूल करणारा विमर्श उभा केल्याचं पाहायला मिळतंय.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राज्यात मोगलाई यायला हवी मग पेशवाई कशी आली? अशा प्रकारचा खुळचट प्रश्न हल्ली विचारला जातोय. असा प्रश्न विचारणाऱ्या या थोर विद्वानांना हे ठाऊक नाही वाटतं की, शंभुराजांच्या हत्येनंतर छत्रपति राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, संताजी घोरपडे, धनाजी जाधव अशा कित्येकांनी स्वराज्यासाठी मोठा संघर्ष केला होता; मग मोगलाई कशी येईल? मुळात पेशवे म्हणजे छत्रपतिंचे सेवकच होते, ते मराठा साम्राज्याचे मंत्री होते, त्यांना मराठा राजाच्या छत्रपतींची सेवा करण्याचा अधिकार होता. थोरले बाजीराव, नानासाहेब पेशवे , चिमाजी अप्पा यांना छत्रपतिंविषयी किती आदर होता, याचे उल्लेख समकालीन कागदपत्रात दिसून येतो. त्यामुळे जर….मोगलाई यायला हवी मग पेशवाई कशी आली? अशा खुळचट प्रश्न विचारणाऱ्या विघातक शक्तींचे डाव समाजाने संघटीतपणे हाणून पाडण्याची गरज आहे.
शिख गुरू ‘गुरू तेज बहादूर’ ह्यांनी हिंदूंच धर्मांतर रोखण्यासाठी लढा दिला. तसेच महाराणा रंजीतसिंग ह्यांनी सुद्धा मुस्लीम आक्रमकांविरोधात लढा दिला. बरेच संत हे भक्ती मर्गाचा तेव्हा प्रसार करत होते. जसे की संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव, संत मिराबाई आणि बरेच. त्यामुळे अशा कठीण काळामध्ये देखील समाजाचा हिंदू धर्मावर विश्वास होता.
छत्रपती शिवाजी महाराज असो, वा छत्रपती संभाजी महाराज, यांच्यासंदर्भात लगेचच मनुवादी, मनुवाद्यांची कारस्थाने, कृष्णाजी भास्कर, अनाजी पंत यांच्यासारख्या कोळशांची उगाळणी केली जाते. छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लीम हे तर सदासर्वदा वाजणारे टुमणे. जितेंद्र आव्हाड वगैरे मंडळी स्वराज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे टोक कसे बोथट करता येईल, यासाठीच प्रयत्न करीत असतात. छावा चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांनी जी पोस्ट लिहिली… त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे इतिहासाला जातीय किनार लावण्याचा प्रयत्न तर केलाच परंतु अख्ख्या पोस्टमध्ये कुठेही औरंगजेबाने महाराजांची छळ करुन हत्या केली, अशा संदर्भातील उल्लेख आव्हाडांनी जाणीवपूर्वक टाळला, हे मात्र निश्चित. हे कुणाच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी चाललंय, हे वेगळं सांगायलाच नको. आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला वाहाव्या हा त्यांचा प्रश्न. मात्र, मनुवाद्यांचा बागुलबुवा करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम त्यांनी करू नये.
छावा चित्रपटात इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आल्याचा आरोपही सुरुवातीला करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम खेळताना एका गाण्यामध्ये दाखवले होते. त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला. त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छान उत्तर दिलंय, ‘लेझीम महाराष्ट्राचा पारंपारिक खेळ आहे, त्यामुळे संभाजी महाराजांनी कधीतरी लेझिम हातात घेतलेही असेल. त्याचा उल्लेख इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल…’, यावरून चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या मनातली भावना राज ठाकरेंना नक्कीळ कळली हे खरं. असो… प्रेक्षकांच्या भावनांना ठेच पोहोचू नये म्हणून दिग्दर्शकाने योग्य ते बदल करून हा भव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि चित्रपटाने लोकांच्या मनावर अधिराज्यही गाजवलं.
आपल्याला ठाऊक आहे की, सत्ता मिळवण्यासाठी औरंगजेबाने वडील शाहजहानला कैद केले. त्यानंतर आपला भाऊ दारा शिकोह याला देशद्रोहाच्या आरोपाखाली सुळावर चढवलं. दुसरा भाऊ मुराद यालाही विष देऊन ठार केलं. त्याने आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या करून सिंहासन मिळवले. संपूर्ण भारतावर राज्य करण्याचे औरंगजेबाचे एकच ध्येय होतं. पण मराठ्यांशी झुंज देणाऱ्या औरंग्याला पराभवाला सामोरे जावेच लागले.
डाव्या वाळवीने आज जो खोटा प्रचार केलाय त्याचा पर्दाफाश करण्यासाठी औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रकार मुहम्मद साकी मुस्तइद्द खान याने लिहिलेल्या ‘मासिर-ए-आलमगिरी’ मधील “Capture and Execution of Sambha” या प्रकरणाचा संदर्भच पुरेसा आहे. हे प्रकरण औरंगजेबाच्या हिंदूद्वेषी मानसिकतेचे ठोस प्रमाण आहे. इतिहासाचे विकृतीकरण करणारे काही इतिहासकार औरंगजेबाला “दयाळू शासक” म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात, परंतु वास्तविकता अशी आहे की, त्याने हिंदू राजांवर जे अमानवी अत्याचार केले, ते इतिहासाच्या पानांमधून कधीच पुसले जाऊ शकत नाहीत. औरंगजेब हिंदूंविषयी केवळ राजकीय वैर बाळगत नव्हता, तर तो त्यांचा संपूर्ण नाश करायचा कट आखत होता. त्याने संभाजी महाराजांना एक ‘काफिर राजा’ मानले होते आणि त्यांचा अपमान म्हणजे इस्लामचा विजय असल्याची भावना त्याने स्वतःच्या सैन्यात पसरवली होती. त्याने संभाजी राजेंना धर्मांतरासाठी सुद्धा प्रवृत्त केले होते, पण खरं सांगायचे झाले तर औरंगजेबाने संभाजी महाराजना कधी ओळखलेच नाही. संभाजी महाराज हे धर्मवीर होते, ते धर्मासाठी मरण पत्करणारे योद्धा होते. मुघलांना वाटले की, त्यांनी मराठ्यांचा आत्मा चिरडला आहे. पण त्यांची ही कल्पना पूर्णपणे चुकीची ठरली. संभाजी महाराजांच्या बलिदानाने मराठ्यांच्या रक्तात असलेल्या स्वातंत्र्याच्या ज्योतीला आणखी तेज दिले. आता हे सारे मुघलांनीच लिहून ठेवले आहे.
त्यामुळे स्वराज्याचा खरा इतिहास कितीही लपवण्याचा प्रयत्न केला किंवा खोट्या गोष्टी मांडून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तरी आता या गोष्टी सफल होणार नाहीत.