जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे एका हृदयद्रावक दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला आहे. पुलाच्या कामासाठी असलेल्या पत्र्याच्या शेडजवळ वाळूचा टिप्पर खाली केल्याने मजुरांवर वाळूचा ढिगारा कोसळला आणि ते गंभीररीत्या दबले गेले. यात पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली
जाफराबाद तालुक्यातील पासोडी-चांडोळ रोडवर पुलाचे काम चालू होते. या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथील मजूर येथे पूल उभारणीचे काम करत होते. पत्र्याचे शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते.
दरम्यान, रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले होते. एकूण सात जण या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. दरम्यान, या पुलाच्या कामासाठी रात्रीला साडेतीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला. अवैधरित्या वाळूची वाहतूक करत असल्याने घाई गडबडीत अंधारामध्ये त्यांनी पत्र्याच्या शेडवरच वाळू पलटी केली. यामुळे शेडमध्ये झोपलेल्या पाच जणांचा दबून मृत्यू झाला.घटनास्थळी तातडीने पोलीस उपस्थित झाले. सदर टिप्पर चालक जाफराबाद तालुक्यातला असून तो रात्री घटना घडताच फरार झाला आहे.
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा झाला असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.