नालासोपारा | गर्भवती राहिलेल्या मुलीची संतप्त आईनेच गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. विशेष म्हणजे या घटनेत मृत मुलीच्या अल्पवयीन बहिणीनेही आईला मदत केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून, अल्पवयीन मुलीला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नालासोपारा येथे राहणारी अस्मिता दुबे (वय 19) ही तरुणी गुरुवारी दुपारी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता काही संशयास्पद बाबी आढळून आल्या.
हेही वाचा : ब्रेकअप केलं म्हणून प्रियकराचं संतापजनक कृत्य, खोटं कारण देत बोलावलं रात्री अन्…
अस्मिताच्या चेहऱ्यावर सुज आढळली, तसेच तिच्या दोन्ही हातांवर चावल्याचे व्रण होते. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना मोठा धक्का बसला. अहवालात स्पष्ट झाले की अस्मिताची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
पोलिसांनी अधिक तपास सुरू करताच सत्य समोर आले. अस्मिता गर्भवती असल्याचे आई ममता दुबे हिला समजले आणि ती संतापली. तिने तिला बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान अस्मिताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तिच्या हातांवर चावा घेतल्याच्या खुणा आढळल्या.
हत्येच्या रात्री, अस्मिताची 17 वर्षीय लहान बहीण तिला पकडून ठेवत असताना आईने तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी तिच्या आत्महत्येचा बनाव रचला आणि पोलिसांना फोन करून माहिती दिली.
या घटनेनंतर पोलिसांनी आई ममता दुबे हिला अटक केली असून, तिच्या अल्पवयीन मुलीला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. या मुलीची सध्या 12वीची परीक्षा सुरू आहे. ममता दुबे हिला न्यायालयात हजर केले असता तिला 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अमरसिंह यांनी दिली.