पुण्यातील काँग्रेस नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना शिंदे गट प्रवेशाच्या चर्चा जोर धरत आहेत. याला कारणही तसे मिळाले आहे. धंगेकर यांनी त्यांच्या WhatsApp स्टेटसवर काही दिवसांपूर्वी भगव्या उपरण्यासह ठेवलेला फोटो आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या मुलाच्या वाढदिवसाला उपस्थित राहून तो साजरा केला. उदय सामंत यांनी या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
धंगेकरांचे स्पष्टीकरण – ‘मी अजूनही काँग्रेसमध्येच’
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रवींद्र धंगेकर यांनी स्पष्टीकरण दिले की, तो फोटो शिवजयंतीमधील आहे आणि त्यांना तो चांगला वाटला म्हणून त्यांनी स्टेटस ठेवले. “हिंदू धर्म आहे, भगवा गळ्यात ठेवणं गैर काय आहे? सगळीकडे मित्र आहेत, सगळ्या पक्षात मित्र आहेत. येणं-जाणं होतं, त्यामुळेच फोटो बाहेर आल्याने चर्चा सुरू आहे. मी अजित दादांना देखील भेटतो. मी अजूनही काँग्रेसमध्येच आहे. धर्माचा अभिमान आहे, पण द्वेष करणं आपल्याला जमत नाही.”त्यांनी असेही स्पष्ट केले की शिवसेनेच्या नेत्यांकडून आपले स्वागत झाले असले तरी त्याचा अर्थ पक्ष बदलणे असा होत नाही..
कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय
रवींद्र धंगेकर यांनी पुढे सांगितले की, ते कोणताही निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेणार आहेत. “मी जाताना लपून जाणार नाही आणि येताना लपून येणार नाही. माझे मागील स्टेटस बघा, मला जे चांगलं वाटतं ते मी स्टेटसला ठेवतो. यात सर्वसामान्य नागरिकांचे स्टेटसपण असतात.”
उदय सामंत यांनी त्यांना पक्ष प्रवेशासाठी ऑफर दिली का? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले की, उदय सामंत मित्र आहेत, आणि प्रत्येकाला आपला मित्र जवळ हवा असतो. “मी लोकांशी बोलतो, लोकांसाठी काम करतो. तीस वर्षे लोकांसाठी काम करतोय आणि लढतोय. त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घेईन.”
पुढील दोन दिवसांत होणार महत्त्वाचा निर्णय
धंगेकर यांनी स्पष्ट केले की, पुढील दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पुढील राजकीय वाटचाल ठरवली जाईल. “आज मी काँग्रेसमध्ये आहे, उद्या पण काँग्रेसमध्येच असेन. पण, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायच्या आहेत. सध्या सोशल मीडियावर जे सुरू आहे, त्याबाबत त्यांना काय वाटतं हे समजून घेईन.”