प्रयागराज येथे कुंभ स्नान करून परतीच्या प्रवासाला निघालेल्या भाविकांच्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या कुड्लो येथील रहिवासी नरेश व्यंकटेश (वय ३५) आपल्या केए ५१ एमएक्स ८७६१ क्रमांकाच्या कारने प्रयागराज ते नागपूर मार्गे शिर्डीला जात होते. त्यांच्यासोबत पत्नी रमेश्री (वय ३२), बहिण शकुंतला (वय ५०), मुलगा पूर्विक नरेश (वय ६) आणि मित्र संजय नाझंया (वय ४०) कारमध्ये प्रवास करत होते.
वर्ध्याजवळील येळाकेळी परिसरात समोर जात असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना कारचालकाला झोपेची डुलकी आली. त्यामुळे कारवरील ताबा सुटला आणि ती थेट बॅरिकेटला धडकली. या भीषण अपघातात रमेश्री आणि शकुंतला यांचा जागीच मृत्यू झाला, तर नरेश गंभीर जखमी झाला. संजय आणि पूर्विकही अपघातात जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले. तसेच सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसांनी तातडीने सीआरओ मुंबई आणि नागपूर यांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार महामार्गावरून बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली.
समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. झोपेमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक असून, वाहनचालकांनी सतर्क राहून प्रवास करण्याचे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.