सोलापूर : राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. घरकुल लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी प्रशासनाच्या कारवाईत जप्त केलेली वाळू मोफत दिली जाणार आहे. यामुळे घरकुलांच्या बांधकामाला गती मिळणार असून, लाभार्थींच्या आर्थिक भारातही मोठी कपात होणार आहे.
२०२३चे वाळू धोरण रद्द; २०२५साठी सुधारित धोरण
तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रास दराने वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण जाहीर केले होते. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने अनेक लाभार्थ्यांना स्वस्त वाळू मिळाली नाही. परिणामी, हजारो घरकुलांची कामे रखडली. आता हे धोरण २०२३ऐवजी रद्द करून २०२५साठी सुधारित वाळू धोरण आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१०० दिवसांत घरकुल पूर्ण करण्याचा प्रयत्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाअंतर्गत घरकुल लाभार्थींची घरे मुदतीत पूर्ण व्हावीत, यासाठी ही मोफत वाळू देण्याची योजना आखली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २० लाख घरकुलांना मंजुरी
राज्यात २० लाख घरकुलांना मंजुरी
१० लाख लाभार्थ्यांना १५,००० रुपयांचा पहिला हप्ता वितरित
सोलापूर जिल्ह्यातील ६२,००० बेघर लाभार्थी लाभार्थींचा समावेश
सोलापूर जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांनी ६०० रुपये ब्रास वाळूच्या योजनेसाठी सुमारे ६०,००० ब्रास वाळूची मागणी केली होती. मात्र, ही वाळू त्यांना मिळाली नाही, त्यामुळे अनेक घरकुलांचे काम सुरूच होऊ शकले नाही.
जप्त वाळूचा घरकुल लाभार्थ्यांना उपयोग
सध्या घरकुल बांधकामाचा खर्च वाढल्याने १५०,००० रुपयांच्या अनुदानात संपूर्ण घर बांधणे कठीण झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन शासनाने जप्त वाळू लाभार्थ्यांना मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या घरांच्या बांधकामाला मोठी चालना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेकांना हक्काचे घर पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
घरकुल लाभार्थ्यांना यादीनुसार मिळणार वाळू
जप्त केलेला वाळू साठा कोणत्या तालुक्यात किती आहे, याची यादी तयार होणार
तालुकानिहाय लाभार्थ्यांची यादी संबंधित गटविकास अधिकारी (BDO) संकलित करणार
घर बांधण्यासाठी आवश्यक वाळूची मात्रा निश्चित केली जाणार
लाभार्थींनी स्वतः संबंधित ठिकाणाहून वाळू न्यायची
महसूल विभागाचा अधिकारी संपूर्ण प्रक्रिया देखरेख करणार
.