राज्यात तापमानातील वाढ कायम आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका तीव्र असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. देशातील कमाल तापमानात वाढ होत असून, सोमवारी (ता. २४) आंध्र प्रदेशातील कर्नुल येथे देशातील उच्चांकी ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे ३७.९ अंश तापमान नोंदवले गेले. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवणार आहे. कोकण आणि लगतच्या भागांमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार असून, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातही उन्हाचा प्रकोप वाढत आहे. अनेक भागांत सूर्य डोक्यावर येताच बाहेर पडणे कठीण होत आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्र काहीसा अपवाद ठरतो आहे. पहाटेच्या वेळी अजूनही गारवा जाणवत असला, तरी दिवसा तापमान झपाट्याने वाढत आहे.
हेही वाच : आनंदाची बातमी! राज्य शासनाकडून ‘नमो किसान सन्मान निधी’त वाढ; शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार…
हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांच्या माहितीनुसार, 25 आणि 26 फेब्रुवारीला राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारीला मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे; तर 26 फेब्रुवारीला पालघरमध्ये तापमानवाढ होईल आणि उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान वाढीचा कल कायम राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जळगावात पुढील दिवसांत असं राहणार तापमान
२५ फेब्रुवारी : किमान -१७ …. कमाल -३६
२६ फेब्रुवारी : किमान -१६… कमाल ३६
२७ फेब्रुवारी : किमान १५… कमाल ३७
२८ फेब्रुवारी : किमान १५… कमाल ३७
१ मार्च : किमान १७… कमाल ३७