मुंबई : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान चढेच राहण्याची शक्यता असून, नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची तीव्रता जाणवत असून, तापमान सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले गेले आहे.
हेही वाचा : फलटणला जाण्यासाठी आली अन् घात झाला, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते.
मुंबई आयएमडीच्या वरिष्ठ अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले की, ‘तापमान सामान्यपेक्षा पाच अंशांच्यावर पोहोचल्यावर इशारा दिला जातो. या काळात दुपारी बाहेर पडणे टाळावे, बाहेर जाणे आवश्यक असल्यास पाणी सोबत ठेवावे.’ फेब्रुवारी महिन्यात तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवले जाण्याची ही एका दशकातील चौथी वेळ आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात कमालीची उष्णता जाणवत आहे.
हेही वाचा : गंगेच्या घाटावर सुटकेसमध्ये सापडला महिलेचा मृतदेह, दोन महिलांना अटक
‘या’ सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच येत्या दोन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात तीव्र उष्णता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
मुंबईत तापमानात मोठी वाढ
सोमवारी दुपारी मुंबईतील सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दमट हवामानामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास अधिक जाणवत आहे. या उष्णतेमुळे सांगली जिल्ह्यात एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, उन्हाळ्याच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.