वॉशिंग्टन: अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांवर कठोर कारवाईचा पाश आणखी आवळणार आहे. अमेरिकन सरकारने एक असा मसुदा तयार केला, ज्याच्या माध्यमातून पाकिस्तानसह ४१ देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी घातली जाणार आहे. यावेळी हे प्रतिबंध अधिक व्यापक स्वरूपातील असतील. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांवर बंदी घातली होती.
अमेरिकेने बंदी घातलेल्या ४१ देशांमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भूतानचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकार अवैध घुसखोरांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या शिफारसींचा समावेश असलेला मसुदा अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी तयार केला. यात व्हिसा जारी केल्यास आंशिक निलंबनाचा सामना करावा लागू शकतो, अशा २६ देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शहबाझ शरीफ यांच्या नेतृत्वातील सरकारने ६० दिवसांत या कमतरता कमी केल्यास मोठ्या कारवाईतून त्यांची सुटका होऊ शकते
तुर्कमेनिस्तान, बेलारूस, भूतान आणि वानुअतूचा कारवाई करण्यात आलेल्या देशांमध्ये समावेश आहे. यापूर्वी प्रवेशबंदी संदर्भातील वृत्त पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने फेटाळले होते. अशा प्रकारच्या प्रतिबंधांबाबत कोणतेही अधिकृत संकेत मिळाले नसल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी सागितले होते. या केवळ चर्चा असून, त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
पाकिस्तान-अमेरिकेतील तणाव वाढला
तुर्कीतील पाकिस्तानी राजदूत के. के. अहसान वागन यांना या आठवड्यात अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला आणि त्यांची लॉस एंजेलिस येथून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेतील तणाव वाढला. यामागे अमेरिकेने कोणतेही कारण सांगितले नाही. मात्र, त्यांच्या वादग्रस्त व्हिसा संदर्भाची माहिती अमेरिकन इमिग्रेशन सिस्टिमला मिळाली होती, असे वृत्तात म्हटले आहे.