नागपूर : छत्रपती संभाजी नगर येथील औरंगजेबाची कबर हटवावी, या मागणीसाठी सोमवारी नागपुरात हिंदू संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं होतं. सायंकाळच्या सुमारास महालातील चिटणीस पार्क, तसेच गांधी गेट परिसरात दोन गट समोरासमोर भिडले.
त्यानंतर यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली व पोलिसांच्या दिशेने दगडफेक करत धक्काबुक्की केली. तसेच वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आली. यात दोन पोलिसांचे कपडेदेखील फाटले. काही समाजकंटकांनी रस्त्यांवरील वाहनांना आग लावली.जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दगडफेकीत १५ पोलिस जखमी झाले
नागपूरमधील सोमवारच्या रात्री हिंसाचार नियंत्रित करताना भालदारपूर परिसरात आपल्या कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना अंधाराचा फायदा घेत जमावाने त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही माथेफिरूंनी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचे प्रयत्न केला. नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्थानकामध्ये असे लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या जमावा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नागपुरातील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा या आरोपींना कोर्टाने 21 पर्यंत पीसीआर दिला आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. आतापर्यंत एकूण 46 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं.