सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’चा बोलबाला असला तरी सध्याच्या ‘एआय’ला वैज्ञानिक ‘एएनआय’ असे संबोधतात. ‘एएनआय’ म्हणजे ‘आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स ही कृत्रिम बुद्धिमत्ता सामान्य दर्जाची असून, ती केवळ काही विशिष्ट कामे करण्यापुरतीच सक्षम आहे. भविष्यात ‘एजीआय’ म्हणजेच संपूर्णपणे मानवी बुद्धीइतकीच सक्षम अशी ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ येऊ शकेल, असे मानले जाते.
एखादा मानव ज्या सहजतेने विविध कामे करू शकतो, तितक्याच सहजतेने ही कृत्रिम बुद्धिमत्ता कार्य करील. त्यानंतर ‘एएसआय’ म्हणजेच ‘आर्टिफिशियल सुपरइंटेलिजन्स’चा जमाना येऊ शकतो. ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेपेक्षाही सरस असेल. अर्थात, सध्या तरी ‘दुर्बल’ म्हणवल्या जाणाऱ्या ‘एएनआय’ नेच माणसाला इतके थक्क केले आहे, तर या पुढच्या दोन कृत्रिम बुद्धिमत्ता कशा असतील, याची कल्पनाच केलेली बरी! काही संशोधकांच्या मते, ‘एजीआय’ म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेच्या पातळीची कृत्रिम बुद्धिमत्ता अगदी पुढच्या वर्षीही उपलब्ध होऊ शकेल.
अर्थात, अनेक संशोधकांना हे पटत नाही! ‘एआय मल्टिपल रिसर्च’ या संस्थेचे प्रमुख विश्लेषक सेम दिलमेजानी यांनी नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात २००९ ते २०२३ या कालावधीत वैज्ञानिक, एआय तज्ज्ञ आणि उद्योजकांनी केलेल्या ८,६०० भाकितांचे विश्लेषण करण्यात आले. विशेषतः १० वेगवेगळ्या सव्र्व्हेत ५,२८८ एआय संशोधकांचा सहभाग होता.
या अभ्यासानुसार, २०४० ते २०६१ दरम्यान एआय मानवी स्तरावर पोहोचण्याची ५० टक्के शक्यता आहे. मात्र, अलिकडील सर्वेक्षणांनुसार, ‘एजीआय’ हे त्यापेक्षाही लवकर म्हणजे अगदी पुढच्या वर्षी येऊ शकते. २०२३ मध्ये २,७७८ वैज्ञानिकांवर केलेल्या एका सर्वेक्षणात २०४० पर्यंत ‘एजीआय’ साकार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. काही संशोधक, जसे की ‘ॲथोपिक’ या एआय कंपनीचे सीईओ दारियो अमोडेई, यांच्या मते ‘एजीआय’ २०२६ पर्यंतही येऊ शकते।
‘एजीआय’च्या वेगवान विकासामागील मुख्य कारण म्हणजे ट्रान्स्फॉर्मर आधारित मोठे भाषा मॉडेल. हीच ती तंत्रज्ञानाची शाखा आहे. जिच्या आधारे एआय प्रणाली विकसित झाल्या आहेत. २०१९ मध्ये काही संशोधकांचा असा विश्वास होता की, ‘एजीआय’ हे २०६० पर्यंत किंवा कदाचित कधीच येणार नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत ‘एआय’च्या क्षमतेत झालेली झपाट्याने वाढ पाहता, तज्ज्ञांचा अंदाज आता अधिक लवकरच्या कालावधीकडे झुकत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान प्रगतीमुळे भविष्यात मानव आणि मशीन यांच्यातील नाते कसे असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.