---Advertisement---
भुसावळ : शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी मुकेश प्रकाश भालेराव हत्या प्रकरणात शहर पोलिसांनी मृताच्या पत्नीसह चार संशयिताना अटक केली आहे. जुन्या वादातून मारहाण करीत मुकेशची हत्या केल्यानंतर संशयितानी त्याचा परस्पर दफनिवधी केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आला होता. खून प्रकरणी शहर पोलिसात सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात मृताच्या पत्नीचाही सहभाग आढळल्याने तिलाही आरोपी करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी दिली.
होळीच्या दिवशी हत्या करीत मृतदेहाची विल्हेवाट
सूत्रांनुसार, १३ मार्च रोजी हद्दपार आरोपी मुकेश भालेराव हा मध्यरात्री भुसावळातील भिलवाडा भागातील घरी आल्यानंतर संशयितांना चाहूल लागली व त्यांनी मध्यरात्रीच त्याला धारदार शस्त्रांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू ओढवला व त्यानंतर संशयितांनी मृतदेह यावल रोडवरील तापी नदीपात्राजवळील काकाचा ढाब्यामागील घनदाट जंगलात पुरला. शहर पोलिसांना खुनाची कुणकुण लागताच त्यांनी मयताची पत्नी सुरेखा भालेराव तसेच मनोज राखुंडे, जितू भालेराव यांची खोलवर चौकशी केल्यानंतर खून प्रकरणाचे बिंग समोर आले.
मयताच्या पत्नीसह चौघांना अटक
पोलिसांनी खून प्रकरणात सुरूवातीला शुक्रवारी मनोज राखुंडे व जितू भालेराव यांना अटक केली होती तर पोलीस चौकशीत या खून प्रकरणात मृताची पत्नी सुरेखा भालेरावचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला तसेच गुन्ह्यातील सहभागी आरोपी रोहन तायडे (भुसावळ) यास शनिवारी अटक करण्यात आली, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अटकेतील मनोज राखुंडे व जितू भालेराव यांना शनिवारी न्यायालयात हजर केल्यानंतर २६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर शनिवारी अटक केलेल्या आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
आरोपींचा खून प्रकरणातील सहभाग व नेमकी घटना कशी घडली याची पोलिसांकडून पोलीस कोठडीत खोलवर चौकशी केल्यानंतर अधिक माहिती समोर येणार आहे. दरम्यान, मृत मुकेशच्या मृतदेहावर जळगाव येथे शवविच्छेदन करण्यात आले, मात्र पीएम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यू कसा झाला? याबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
सहा संशयितांविरोधात गुन्हा
मुकेश भालेरावच्या खून प्रकरणी मयताचा भाऊ अविनाश प्रकाश भालेराव (४४, बोरावल बु.।।) यांच्या फिर्यादीवरून मनोज राखुंडे, जितू भालेराव, विकास राखुंडे, रोहन तायडे व अन्य दोन अल्पवयींनाविरोधात भुसावळ शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. १३ रोजी मध्यरात्री आरोपींनी जुन्या वादातून भावाची धारदार शस्त्राने हत्या करीत मृतदेह तापी नदीकिनारी पुरल्याचे फिर्यादीत नमूद आहे.