---Advertisement---
हैदराबाद: इतिहासकार इंद्रजित सावंत यांना मोबाईलवरून धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातून अटक करण्यात आली.
कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कोरटकर तेलंगणात असल्याची माहिती सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आम्हाला मिळाली होती. सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला कोल्हापूर येथे आणणार आहे. तांत्रिक पुराव्याच्या आधारे कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकर फरार झाला होता. त्याच्याविरोधात कोल्हापूर आणि जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत तेलंगणातून कोरटकरला अटक केली.