राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे राष्ट्र परम् वैभवाला जावे आणि तेही ‘याचि देही याचि डोळा’ पाहावे, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प. पू. आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवारांनी व्यक्त केली होती. प्रत्येक स्वयंसेवकाची हीच इच्छा असते. या देशात रामराज्य आलेले डोळ्यांनी पाहावे, ही सर्वांचीच आर्त भावना. याचि देही म्हणजे हा देह जास्तीत जास्त १०० वर्ष आयुष्य असलेला असतो म्हणजे हे राष्ट्र परम् वैभवाला जाण्यासाठी शतक, दीड शतकाचा कालावधी संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. श्रीगुरुजींनाही अपेक्षित आहे. आता संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या १०० वर्षांत संघ सार्वभौम झाला, सर्वव्यापी झाला,
सर्वस्पर्शी झाला आणि सर्वायामी झाला. संघविचार आचारासह घराघरांत आणि मनामनांत पोहोचला, हे सत्य आहे. कुंभमेळ्यात अर्धा भारत श्रद्धेने उपस्थित होता, हे संघविचाराचे फळ आहे. असे असले तरी संघाच्या शतक पूर्व वर्षीच्या विजयादशमी उत्सवात विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवतांनी पंचसूत्री का मांडली असावी? या पंचपरिवर्तनावर शताब्दीनिमित्ताने स्वयंसेवक समाजात का जाताहेत, हे प्रश्न साहजिकच आहेत.
ही पंचसूत्री, पंचपरिवर्तन, पंचोपचार, पंचपदी केवळ स्वयंसेवकांसाठी नसून भारतात राहणाऱ्या नव्हे विश्वातील सर्वांसाठी उपयोगी, महत्त्वाची आणि गरजेची आहे. भारतात तर संघ स्वयंसेवकांनी १०० वर्ष तनमनधनपूर्वक आणि निरपेक्ष कार्य केल्यामुळे ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या विचाराला पोषक वातावरण झाले आहे. तयार झालेल्या शेतीत आता पेरणी बाकी आहे. विचाराचे दाणे टाकताच बहर येणार आहे. १०० वर्षांत हे राष्ट्र परम् वैभवाला जाण्यासाठीची मशागत पूर्ण झाली असून पंचसूत्री हे बीजारोपण आहे. यातूनच रामराज्याची ही मुहूर्तमेढ ठरणार म्हणून पंचपरिवर्तन महत्त्वाचे आहे.
काय आहे पंचसूत्री?
१) सामाजिक समरसता २) कुटुंब प्रबोधन ३) पर्यावरण संरक्षण ४) ‘स्व’चा बोध अर्थात स्वदेशी ५) नागरी कर्तव्ये. ही ती पाच सूत्रे आहेत. बारकाईने विचार केल्यास हा रामराज्याचा जाहीरनामा आहे. ज्या समाजात सर्वांना समान स्थान, समान संधी आणि सर्वांसाठी समभाव आहे तो समाज रामराज्यातच असू शकतो. १४ एप्रिल १९८३ ला गुढीपाडवा होता. या दिवशी प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघसंस्थापक प. पू. डॉ. हेडगेवार या दोन्ही पुण्यात्म्यांची जयंती होती. या पवित्र दिवशी सामाजिक समरसता मंचाची स्थापना झाली. या प्रसंगी संघाचे प्रचारक आणि डॉ. आंबेडकरांचे स्नेही स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे बीजभाषण झाले. त्यात त्यांनी सामाजिक समरसता आणि समरस समाजाची संकल्पना स्पष्ट केली होती. तीच कडी पकडून विद्यमान सरसंघचालकांनी सामाजिक समरसतेला अग्रक्रम दिला. कारण १०० वर्ष संघ स्वयंसेवकांनी निःस्वार्थ आणि निरपेक्ष कष्ट करून पर्यावरण पोषक वातावरण निर्माण केले आहे. सामाजिक समरसता समाजात बहुअंशी निर्माण झाली आहे. एक देवालय, एक पाणवठा, एक स्मशान, एक पंगत आता अपवाद वगळता बहुतेक गावात रुजले आहे. १९८९ मध्ये डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीला संघाचा सेवा विभाग प्रारंभ झाला आणि श्रीगुरुजींच्या जन्मशताब्दीला २००६ मध्ये संघाचा सामाजिक सद्भाव विषय सुरू होऊन कार्य शेवटच्या माणसापर्यंत झिरपले आहे.
पंचपरिवर्तनात दुसरे स्थान कुटुंब प्रबोधनाला दिले आहे. भगवान श्रीरामांच्या कुटुंबाइतके आदर्श कुटुंब दुसरे असूच शकत नाही. भावा-भावाचे, जावा जावाचे, पिता-पुत्राचे आणि पती-पत्नीचे आदर्श म्हणजे श्रीराम भगवंताचे कुटुंब आहे. कुटुंबव्यवस्था भारताचा प्राण आहे. एकत्रित कुटुंब पद्धत असल्यामुळे घर हे संस्कार केंद्र होते. घरातूनच चारित्र्यसंपन्न मनुष्य निर्माण कार्य सहज व्हायचे. देव, देश आणि धर्माचे संस्कार आजी-आजोबा, काका-काकू, आई-बाबा यांच्या आचारविचारांतून होत असत. कालमानाप्रमाणे संयुक्त कुटुंब पद्धतीला दृष्ट लागली. घर भारतात असले तरी घरात भारत नाही, हे कटु सत्य आहे. म्हणूनच सरसंघचालकांनी कुटुंब प्रबोधनाला महत्त्व दिले. ‘आहे त्या परिस्थितीला पाहिजे तसे घडवणे’ हेच आपल्या हातात आहे.
जीवीचा जिव्हाळा, प्रेम, आदर, यथाधिकार, मानसन्मान हे संस्कार कुटुंबात झालेच पाहिजेत त्यासाठी प्रबोधन, विभक्त असलो तरी सणावाराला एकत्रित येणे, आठवड्यात एक दिवस सामूहिक व्हिडीओ कॉल अशा अनेक बाबी कुटुंबाला एकत्रित ठेवू शकतात. म्हणूनच त्यांनी कुटुंबासाठी पंचोपचार सांगितले. भाषा, भूषा, भजन, भोजन आणि भ्रमण. कुटुंबात बोलताना मातृभाषेचा वापर झाला तर बुद्धीचा विकास चटकन होतो, संस्कृतीचे संस्कार सहज संक्रमित होतात. आपली परंपरागत वेशभूषा भारतीयत्व जागे ठेवते. कुटुंबात एकत्रित भजन आणि भोजन जीवीचा जिव्हाळा घट्ट करतो. तीर्थक्षेत्रावर केलेले भ्रमण सद्भाव निर्माण करते. रामराज्यातील कुटुंब म्हणजे अजून दुसरे काय असेल?
पंचसूत्रीमध्ये तिसन्या स्थानावर पर्यावरण संरक्षण आहे. रामराज्यात पर्यावरणाचे महत्त्व महर्षी वाल्मीकिंनी स्पष्ट विशद केले आहे. खरं तर भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे, ज्यात व्यष्टी, समष्टीसोबत सृष्टीला महत्त्व दिले आहे. सृष्टीला महत्त्व दिले तरच परमेष्ठी पदापर्यंत जाता येते.
‘माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः पृथ्वीला माता मानणारी आपली संस्कृती आहे म्हणूनच आपण तुळस, वड, उंबर, गाय, कुत्रा, नद्या, सागर, पर्वत, सूर्यादि ग्रह मंडलाची पूजा करतो. पर्यावरणपूरक बाबी आपल्या सर्वांचा स्थायीभाव बनावा म्हणून सरसंघचालकांनी याबाबत विशेष स्पष्टता आणि आग्रह केला आहे.
पंचसूत्रीमध्ये पुढील सूत्र म्हणजे ‘स्व’चा बोध. हा चौथा बिंदूही विशेष महत्त्वाचा आहे. आध्यात्मिक आणि राष्ट्रीय असा हा विचार. व्यवहार म्हणून विचार केला तर आणि प्रत्येक भारतीय माणसाने स्वदेशीचा वापर केला तर या देशातील अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. शिवाय स्वदेशीचा अंगीकार देशभक्तीचे जागरण करेल. हा झाला एक भाग. ‘स्व’च्या बोधाचा आध्यात्मिक दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. मी कोण? मी कशासाठी आलो? माझे कर्तव्य काय? माझे ध्येय काय? या अशा अनेक प्रश्नांच्या अनुषंगाने कार्यरत राहून उत्तर शोधणे म्हणजे ‘स्व’चा बोध होय.
पंचसूत्रीमध्ये पाचवे सूत्र ‘नागरी कर्तव्ये’ हे आहे. ‘वयं राष्ट्र जागृयाम’ हे आपले सूत्रच आहे. रामराज्यात यावरच भर होता. या देशाप्रती, समाजाप्रती नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत. माणसे नागरी हक्कासाठी सतत भांडत असतात, पण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये, काही जबाबदाऱ्या आहेत. त्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करतो आपण. देशातील राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच समस्यांचे मूळ नागरी कर्तव्याकडे दुर्लक्ष आहे.
धोडक्यात विजयादशमी उत्सवात प. पू. सरसंघचालकांनी दिलेली पंचसूत्री रामराज्याचा मार्ग प्रशस्त करणारी आहे. रामराज्यात समाजात समरस भाव होता. रामराज्यात कुटुंबव्यवस्था मजबूत आणि बळकट होती. रामराज्यात सृष्टीचा विचार अग्रक्रमावर होता. रामराज्यात ‘स्व’चा भाव महत्त्वाचा होता. व्यापारउदिमात स्वराज्यातील तरुणाईला प्रोत्साहन असे. नीतिमत्ता, शुद्ध चाख्यि आणि समाजाप्रती कर्तव्यभाव असल्यामुळे सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्था होती. रामराज्यात प्रजा, राजा, राज्य यांच्यात प्रखर समन्वय आणि एकमेकांप्रती निष्ठा होती. हे राष्ट्र परम् वैभवाला नेण्यासाठी ही पंचसूत्री महत्त्वाची आहे. ‘याचि देही याचि डोळा’ पाहावयाचे असल्याने यावर विशेष लक्ष दिले जात आहे. म्हणूनच प. पू. सरसंघचालकांनी सांगितलेली पंचसूत्री रामराज्याचा राजमार्गच आहे.
प्रा. दिलीप जोशी – ९८२२२६२७३५