रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ मे २०२५ पासून ‘एटीएम’ इंटरचेंज फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना मोफत व्यवहारांच्या मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क भरावे लागेल. जर तुम्ही वारंवार एटीएममधून पैसे काढत असाल, तर १ मे २०२५ पासून असे केल्यास तुमच्या खिशावर भार वाढू शकतो.
एटीएम इंटरचेंज फी म्हणजे काय?
एटीएम इंटरचेंज फी ही बँक दुसऱ्या बँकेच्या एटीएमची सेवा वापरण्यासाठी देते. हे शुल्क सामान्यतः ग्राहकांना लागू होते, विशेषतः जेव्हा ते त्यांच्या बँकेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एसबीआय बँकेचे ग्राहक असाल आणि अॅक्सिस बँकच्या एटीएममधून पैसे काढत असाल, तर तुमची मोफत एटीएम व्यवहार मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला अधिक शुल्क भरावे लागेल. वाढत्या खर्चामुळे शुल्क वाढवण्याचा आग्रह धरणाऱ्या व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सच्या मागणीनुसार आरबीआयने हा बदल केला आहे.
किती शुल्क आकारला जाईल?
वृत्तानुसार, १ मे २०२५ पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागू होणारा शुल्क १७ रुपयांवरून १९ रुपये प्रति व्यवहारापर्यंत वाढेल. बॅलन्स चौकशी, मिनी स्टेटमेंट इत्यादी नॉन-कॅश व्यवहारांसाठी ६ रुपयांऐवजी ७ रुपये प्रति व्यवहार शुल्क आकारले जाईल. या वाढीचा परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांना अधिक होऊ शकतो कारण त्यांना मोठ्या बँकांच्या एटीएम पायाभूत सुविधांवर अधिक अवलंबून राहावे लागते.
मोफत व्यवहारांची मर्यादा ?
आरबीआयच्या सध्याच्या नियमांनुसार, महानगरांमध्ये इतर बँकांच्या एटीएममधून फक्त ३ मोफत व्यवहार करता येतात. ही मर्यादा मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे लागू आहे. इतर ठिकाणांसाठी, ही मर्यादा ५ मोफत व्यवहारांची आहे.