नवी दिल्ली : “रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन लवकरच भारत दौर्यावर येणार असून त्यासाठीच्या व्यवस्था केल्या जात आहेत,” अशी माहिती रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरुवारी दिली.
“रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी भारतीय सरकारकडून आलेले भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारतभेटीची तयारी सध्या सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या वर्षी पुन्हा निवडून आल्यानंतर रशियाला त्यांचा पहिला परदेश दौरा होता. त्यानंतर आता रशियाचे प्रमुख भारतदौर्यावर येतील,” असे लावरोव्ह यांनी म्हटले आहे.

‘रशियन आंतरराष्ट्रीय व्यवहार परिषदे’द्वारे आयोजित ‘रशिया आणि भारत नवीन द्विपक्षीय अजेंडा’च्या दिशेने या परिषदेत व्हिडिओ भाषणादरम्यान रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी हे विधान केले आहे. या परिषदेमध्ये भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीदेखील संबोधित केले. भारत-रशियासोबतच्या आपल्या संबंधांना खूप महत्त्व देतो,” असे अधोरेखित करून जयशंकर यांनी “दोन्ही राष्ट्रांमधील सामायिक परराष्ट्र धोरण प्राधान्य आहे,” असे सांगितले. जयशंकर यांनी दोन्ही राष्ट्रांमधील संबंधांच्या लवचिकतेवर प्रकाश टाकला. “दोन्ही राष्ट्रांचे नाते विश्वास आणि परस्पर आदराच्या दीर्घ परंपरेवर आधारित आहे,” असे सांगितले.