Ramayana-Hindu भगवान श्रीराम हे कपोलकल्पित पात्र असून, रामायण ही केवळ कविकल्पना आहे, असा अपप्रचार काही छद्मधर्मनिरपेक्षवादी आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेले वोकिझमवाले करीत असतात. रामसेतू तोडण्यात यावा यासाठी काँग्रेसच्या महाभागांनी राम ही केवळ कविकल्पना अशा आशयाचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान, आदर्श राजे, आदर्श पती, भाऊ, पुत्र, मित्र, प्रजापालक असलेले भगवान श्रीराम सर्वांचा आदर्श आहेत. शौर्य, धैर्य, पराक्रम यांचे प्रतीक म्हणजे भगवान श्रीराम. एकपत्नी, एकवचनी, एकबाणी असलेले भगवान श्रीराम. भारतीय संस्कृतीचा प्राण म्हणजे भगवान श्रीराम. भगवान राम कविकल्पना नसून ते आपले भारतीयांचे इतिहास पुरुष आहेत. महर्षी वाल्मीकि आणि भगवान श्रीराम हे समकालीन आहेत. श्रीरामाचा काळ नेमका कोणता यावर चर्चा होत असली, तरी सर्व विद्वानांचे मतसार घेतले तर तो कालावधी किमान इ. स. पूर्व ७००० असावा. म्हणजे आजपासून ९००० वर्षांपूर्वीचा असेल.
त्या काळात बखरी किंवा पत्र नव्हते तर महापुरुषांचा इतिहास काव्यरूपात लिहिला जात असे. रामायण या महाकाव्यात भगवान श्रीरामांचे चरित्र प्रत्यक्ष साक्षीदार असणाऱ्या महर्षी वाल्मीकि ऋषींनी लिहिले आहे. स्वतः वाल्मीकिच रामायणात युद्धकांडात १२८ व्या सर्गात ११४ व्या श्लोकात लिहितात-
पूजयश्च पठैश्चैव, इतिहासं पुरातनं ।
वाल्मीकि आदिकवी आहेत. त्यांनी स्पष्ट लिहिले की, हा इतिहास आहे. आपण दरवर्षी श्रीरामनवमी म्हणजे भगवान रामचंद्रांचा जन्म दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. जयंती किंवा पुण्यतिथी या काल्पनिक व्यक्तींच्या नसतात तर त्या अस्तित्वात होत्या त्या महापुरुषांच्याच साजऱ्या होतात. भारताचा भूगोल पाहिला तर वाल्मीकि रामायणात उल्लेख असलेली अयोध्या नगरी, श्रीलंका, पंचवटी, किश्किंधा अशा अनेक नगरी आजही अस्तित्वात आहेत. वाल्मीकि रामायणात उद्धृत नद्या, पर्वत आणि अरण्य आजही अस्तित्वात आहेत. गंगा, यमुना, मंदाकिनी, गोदावरी इत्यादी नद्या, ऋषमुख पर्वत, विंध्य, हिमालय, महेंद्र, मलय असे पर्वत इतिहास साक्ष आहे. ज्या रामसेतूला तोडण्याचा प्रयत्न झाला तो रामसेतू कसा बांधला, याचे वर्णन युद्धकांडात २२ व्या सर्गात ६० व्या आणि ६५ व्या श्लोकात आहे.
हस्तिमात्रांत महाकायः, पाषाणश्च महाबलः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य, यंत्रैः परीवहंतीच ।।
रामसेतू तयार करताना नळाने हत्तीच्या आकाराच्या शिळा, महेंद्र पर्वतासारखे पर्वत कापून यंत्रांच्या साह्याने आणल्याचे वर्णन आहे. ‘तरुभिःसेतू बध्नंति वानरः।’ म्हणजे मोठमोठ्या वृक्षांची लाकडे त्या सेतूवर लावली होती. हा सेतू बांधताना पाच टप्पे पाडले होते. त्यात अनुक्रमे १४ योजने, २०, २१, २२, २३ अशा पाच टप्प्यांत १०० योजने हा सेतू तयार केल्याचे वर्णन आहे. हा सेतू आजही अस्तित्वात आहे. भगवान ज्या मार्गाने अयोध्या ते पंचवटी आणि पंचवटी ते श्रीलंका गेले तो मार्ग, ती स्थाने आजही अस्तित्वात आहेत. ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात भगवान रामभद्रांचा स्पष्ट उल्लेख आहे.
भद्रो भद्रया सचमान आगात्स्वसारं जारो अभ्येति पश्चात् ।
सुप्रकेतैर्द्युभिरग्निर्वितिष्ठन्रुशद्भिर्वर्णैरभि राममस्थात् ।
इथे भद्र म्हणजे रामभद्र, भद्राया म्हणजे सीतामाता, इथेच रावणाचाही उल्लेख आहे.
याज्ञवल्क्य स्मृतीत भारद्वाज संहितेतही स्पष्ट उल्लेख आहे.
अवताराः बहवः सन्ति कलाश्चांशविभुतयः।
राम एव परंब्रह्म सच्चिदानन्दाव्ययम्।।
कला, अंश, अंशांश, विभूती असे अवताराचे प्रकार सांगतांना राम हे सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म असल्याचा उल्लेख आहे. स्वतः श्रीराम मात्र मी मनुष्यच आहे, राजा दशरथाचा मी पुत्र असल्याचे सांगतात.
आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् ।
योऽहं यस्य यतश्चाहं भगवांस्तद्ब्रवीतु मे ।।
कितीतरी ठिकाणी भगवान रामचंद्रांचा प्रत्यक्ष पुरावा दिसतो. अभ्यासकांनी प्रचंड अभ्यास करून अयोध्या ते श्रीलंका हा मार्ग शोधून काढला आहे. महाकुंभ मेळ्यात गेलेल्या कोट्यवधी लोकांनी त्रिवेणी संगम काठावर श्रीराम कुठे थांबले होते, गुह राजांनी त्यांना गंगापार कुठल्या स्थानावरून केले ती स्थाने पाहिली आहेत. महाकवी कालिदासांनी रघुवंशात वर्णन करताना इथे कोणती झाडे आहेत, मसाल्याचे पदार्थ, मोती-शिंपल्याची शेती यांचे वर्णन आहे. अज राजांच्या काळातील सर्व बाबी आजही जशाच्या तशा जुळतात. महाभारत युद्धात देशोदेशीच्या राजांनी सहभाग नोंदविला होता.याच युद्धात भगवान श्रीरामांच्या साधारण 32 व्या पिढीतील राजा बृहद्बल यांनी सहभाग घेतल्याचे महाभारत सांगते.
अनेक साधुसंतांनी आपल्या ग्रंथातून भगवान श्रीरामाचा उल्लेख केलेला आढळून येतो. ‘श्रीगुरुग्रंथसाहेब’ या पवित्र ग्रंथात अडीच हजार वेळा श्रीरामनाम आहे. उत्तरेत तुलसीरामायण, मराठीत भावार्थ रामायण, पंजाबीत गोविंद रामायण, कानडीत पंप रामायण, तेलगूत मल्लरामायण, तामिळमध्ये कंब रामायण, बंगालीत कृत्तिवास रामायण इतकेच नाही तर आंग्ल, जर्मन, इटालियन, चिनीसह अनेक विदेशी भाषांत रामायण लिहिले गेले आहे. त्यातील कुटुंबव्यवस्था, एकमेकांविषयीचा जिव्हाळा, प्रेम आदर, संस्कार याबद्दल सर्वांनाच आस्था आहे. श्रीराम हे इतिहासपुरुष आहेत आणि श्रीरामायण हा अस्सल इतिहास आहे. या देशात आदर्श घ्यावा असे तीन युगपुरुष राजे होऊन गेले ते म्हणजे राजे श्रीरामचंद्र, राजे श्रीकृष्णचंद्र आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज. हे तिन्ही राजे आपला इतिहास आहेत. ते आपले प्रेरक आहेत. म्हणूनच भगवान श्रीराम हे आपले आदर्श आहेत. ते काल्पनिक पात्र नसून ते आपला देदीप्यमान आणि अस्सल इतिहास आहे.