नंदुरबार : शहरातील दिगंबर जैन समाजातर्फे गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी अहिंसा परमोधर्माचे प्रणेते भगवान महावीर जयंती निमित्त भव्य शोभा यात्रेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील माणिक चौक भागात दिगंबर जैन समाजाचे मंदिर आहे. विश्व कल्याणक भगवान महावीर जयंती निमित्त गुरुवारी सकाळी आठ वाजेला सजवलेल्या वाहनावरून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
असा होता मिरवणुकीचा मार्ग
मिरवणूक, माणिक चौक, घी बाजार, जळका बाजार, टिळक रोड, सोनार खुंट, महाराष्ट्र व्यायाम शाळा, हाट दरवाजा, अहिल्याबाई विहीर मार्गे पुन्हा माणिक चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. या ठिकाणी दिगंबर जैन समाजातर्फे हजारो भाविकांना थंडगार दूध आणि शीतपेयाचे वाटप करण्यात आले. भक्ती गीतांसह नमोकार मंत्राचा जप करीत शोभायात्रेचे शहरातील प्रमुख मार्गावर भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. दिगंबर जैन मंदिरातील भगवान महावीर मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दिगंबर जैन समाजाचे खानदेश रिजन प्रमुख सुरेश जैन यांनी मिरवणूक व शोभा यात्रेचे संयोजन केले. भगवान महावीर जयंती निमित्त आयोजित शोभा यात्रा प्रसंगी शहर पोलीस ठाणे व वाहतूक शाखेतर्फे बंदोबस्तासाठी सहकार्य मिळाले.