जळगाव : जिल्ह्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून समाधानकारक आणि सरासरीपेक्षा दीडपट अधिक पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा किंवा अन्य जलसंवर्धन योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील काही तालुक्यात भूजल पातळी उंचावणे शक्य झाले आहे. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याच्या पूर्वोतर भागातील पाच तालुक्यांत भूजल पातळी 0.13 मीटरने खालावली होती. परंतु गत मान्सूनकाळात तसेच जळगाव जिल्ह्यात विशेषतः गेल्या काही वर्षांत झालेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसासह बऱ्याच ठिकाणी शेतजमिनीची बांधबंदिस्ती आणि जलपुनर्भरण योजनेच्या अंमलबजावणीमुळे भूजलपातळीत सरासरी -0.02 ते -1.11 ने वाढ झाली आहे. त्यामुळे काही अंशी का होईना टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याचे संकट तूर्त तरी टळले असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात तीन मोठे, 96 मध्यम तसेच लघु प्रकल्प असून 2019 ते 2023 आणि 2024 च्या मॉन्सूनदरम्यान ते पूर्ण क्षमतेने भरलेले होते. परिणामी जिल्ह्यातील पश्चिम तसेच दक्षिण पट्ट्यातील तालुक्यात भूजल पातळी बऱ्यापैकी आहे. तसेच जिल्ह्याच्या पूर्वेात्तर भागातील मुक्ताईनगर, यावल, रावेर, भुसावळ, बोदवड आदी जलपातळी खालावलेल्या तालुक्यातदेखील जानेवारी 2025 आणि मार्च 2025 दरम्यान निवडक विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी -0.02 ते -1.11 इतकी भूजल पातळीत भर पडली असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
जमिनीच्या पाणीधारण क्षमतेवर परिणाम
जळगाव जिल्ह्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार जरी विहिरींच्या परीक्षणाअंती भूजल पातळी सौम्य स्वरूपात उंचावली असल्याचे नमूद आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या पूर्वेात्तर भागात तापी-पूर्णा या मोठ्या नद्या असून या नद्यांच्या संगमावर हतनूर प्रकल्पामुळे रावेर, यावल तसेच चोपडा परिसरात केळी व हळद तसेच हरभरा आदी बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या परिसरात हतनूर कालव्याद्वारे सिंचन योजना आहेत. शिवाय विहिरी या पारंपरिक पद्धतीने आहेत, परंतु त्यांची पाणीपातळी अत्यंत खोलवर असल्याने भयावह आहे. परिणामी बहुतांश शेती क्षेत्रात सिंचनासाठी उच्च क्षमतायुक्त कृषी पंप असलेल्या बोअरवेल आहेत. रासायनिक खतांचा वारेमाप वापर होत असल्यामुळे परिसरातील जमिनीच्या पाणीधारण क्षमतेवर परिणाम झाला असून जमिनीत पावसाचे पाणी झिरपण्याच्या क्षीण झालेल्या कार्यक्षमतेत काही अंशी वाढ झाली असल्याचेही भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जानेवारी महिन्यात होता 0.06 ते 0.58 घट अहवाल
जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे 178 निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल पातळीचे वाचन वर्षातून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर दरम्यान चार वेळा घेतले जाते. या वर्षी जानेवारी 2025 दरम्यान घेण्यात आलेल्या जलपातळीच्या नोंदी आणि गत पाच वर्षांत तालुकानिहाय तुलनात्मक पाहणी दरम्यान मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, बोदवड, यावल या पूर्वेात्तर भागातील पाच तालुक्यात 0.06 ते 0.58 मीटरने घट झाली आहे. तर पश्चिम भागासह अन्य 10 तालुक्यात सरासरी 0.93 ते 0.09 मीटरने वाढ झाली असल्याचे भूजल सर्वेक्षण यंत्रणा प्रशासनाने म्हटले आहे.
178 विहिरींद्वारे चार वेळा झाले सर्वेक्षण
जिल्ह्यातील 15 तालुक्यांत सर्वात जास्त जामनेर- 24, चाळीसगाव- 21, पारोळा- 16, जळगाव- 15, पाचोरा, चोपडा, अमळनेर प्रत्येकी 14, मुक्ताईनगर- 11, रावेर- 10, भडगाव- 8, धरणगाव, भुसावळ, यावल प्रत्येकी 7, बोदवड 6, एरंडोल- 4 या तालुक्यात एकूण 178 निरीक्षण विहिरींद्वारे भूजल सर्वेक्षण पातळीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर मार्च महिन्यात झालेल्या परीक्षणाद्वारे सर्वच तालुक्यात भूजलपातळीत वाढ झाली आहे.
अशी आहे पाच वर्षातील सरासरी भू-जल पातळीत घट-वाढ
तालुका भूजलपातळी फरक मीटर मध्ये पाच वर्षांपूर्वीची जानेवारी 2025ची मार्च 2025ची
भुसावळ 9.11 5.37 9.75 -0.04
मुक्ताईनगर 10.99 9.11 11.01 -0.02
यावल 23.82 20.98 23.93 -0.11
रावेर 17.07 14.57 17.09 -0.02
चोपडा 12.72 9.99 12.74 -0.02
बोदवड 10.27 5.67 10.43 -0.16
जामनेर 6.74 5.21 7.71 0.97
जळगाव 14.26 11.41 14.37 -0.11
धरणगाव 6.74 6.14 7.60 -0.86
एरंडोल 4.77 3.98 5.73 -0.96
अमळनेर 7.29 5.52 8.05 -0.77
पारोळा 5.53 4.49 6.49 -0.97
पाचोरा 5.49 3.96 6.08 -0.59
भडगाव 5.24 4.27 5.77 -0.53
चाळीसगाव 6.31 5.20 7.42 -1.11