---Advertisement---

जळगावात गुलाबी हरभऱ्याच्या दरात चढ-उतार, दोन आठवड्यात दोन हजारांची घसरण

---Advertisement---

जळगाव : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे जळगाव बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. एकीकडे आवक वाढत असताना, दुसरीकडे भावात चढ-उतार होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुलाबी हरभऱ्याचे १० हजार रुपयांवर गेलेले भाव दोन आठवड्यात २ हजार रुपयांनी घसरले आहेत. आठवडाभरापासूनच हरभऱ्याच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. सर्वच प्रकारच्या हरभऱ्याच्या काही प्रमाणात घट झाली आहे.

२८ मार्च रोजी गुलाबी हरभऱ्याचे दर १० हजार ५०० रुपये क्विंटल इतके होते; मात्र आठ ते दहा दिवसांत दररोज हरभऱ्याच्या दरात घट झाली आहे. शनिवार १२ एप्रिल रोजी बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याचे दर ८१०० रुपये प्रतिक्विंटल एवढे होते. भाव कमी होताच, बाजार समितीमध्ये गुलाबी हरभऱ्याची आवक देखील कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.

शेतकऱ्यांनो, लक्ष द्या! आजपासून पुन्हा नाव नोंदणी

जळगाव : जिल्ह्यात राज्य शासनाच्या भरडधान्य हमीभाव खरेदीअंतर्गत शेतकऱ्यांनी नाव नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्याच्या १६ केंद्रांवर नाफेड हमीभाव भरडधान्य खरेदी अंतर्गत हरबरा, मका, ज्वारी बाजरी आदीसाठी शेतकरी खरेदी नोंदणी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यात बहुतांश शेतकरी सहकारी संघाच्या कार्यालयात ७ एप्रिलपासून शासनाने भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाइन नावनोंदणी सुरू केली आहे.

पहिल्याच दिवशी जळगाव तालुका तसेच पाचोरा भडगाव चाळीसगाव सह अन्य शेतकरी सहकारी संघांच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे शेतकरी संघ कार्यालयाला यात्रेचे स्वरूप असल्याचे दिसून आले. जिल्ह्यात १२ एप्रिल पर्यंत बहुतांश केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाइन नावनोंदणी पूर्ण झाली आहे. यात शेतकऱ्यांनी फक्त ज्वारीसाठी नोंदणी केली आहे तर हरभरा, मका, बाजरीकडे मात्र पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे. उन्हाळी ज्वारी मार्केटमध्ये सध्या फक्त २१०० रुपये दराने खरेदी केली जात आहे. तर शासनाचे हमीदर ३ हजार ३७५ रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करणार असल्याने भावात मोठी तफावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून फक्त ज्वारी खरेदी नोंदणीला शेतक-यांकडून पसंती दिली जात आहे.

हरभरा, मक्का, बाजरीचे मार्केट व शासनाचे दर सारखेच आहेत. नोंदणीदरम्यान तांत्रीक अडथळे शासकीय नोंदणी केंद्रांवर अनेक अडथळे येत असल्याने दिवसभरात केवळ ५० ते ६० शेतकऱ्यांचीच नावे नोंदवली जातात. आजपर्यंत ऑफलाइन ६८७ शेतकऱ्यांनी नावे नोंदवली आहेत. त्यापैकी ३०४ शेतकऱ्यांची नावनोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

आजपासून पुन्हा नाव नोंदणी

१३ व १४ एप्रिल दरम्यान शासकिय सुटी असल्यामुळे ऑनलाईन शेतकरी नावनोंदणी बंद राहणार आहे. मंगळवार १५ एप्रिलपासून नियमितरित्या शासनाने नियुक्त केलेल्या केंद्रांवर नावनोंदणीसाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन केंद्र संचालकांनी केले आहे. ऑफलाइन यादीप्रमाणेच शेतकरी नावे नोंदवली जाणार आहेत. ३०० पर्यंतच्या यादीतील ज्या शेतकऱ्यांची नावनोंदणी झाली नसेल, त्यांना प्राधान्य देऊन नोंदणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment