Stamp Duty : नोंदणी व मुद्रांक विभागास ‘बांधा वापरा हस्तांतरण करा’ या तत्त्वावर खाजगीकरणाच्या संगणकीकरण माध्यमातून करणे, संगणकीकरणांतर्गत कंझ्यूमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात त्याचप्रमाणे स्वीय प्रपंची लेख्यातून खर्च करावयाच्या बाबींमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरिता दस्त हाताळणी शुल्क २० रुपयांऐवजी ४० रुपये करण्यात आले आहे. मुद्रांक हाताळणी शुल्कवाढ करण्यास शासन निर्णय १५ एप्रिल २०२५ नुसार मान्यता मिळालेली आहे.
अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली आहे. नोंदणी मुद्रांक विभागाला खासगीकरणाद्वारे संगणकीकरण करण्याची मुभा देण्यात आली आहे. यात खरेदी-विक्री आणि इतर दस्त करताना ते स्कॅन करून शासनाकडे संग्रहित करून ठेवण्यात येते. जिल्हा विभागीय राज्यस्तरावर यंत्रणा आहे. त्यात सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्क आणि सर्व्हरविषयक कुशल तांत्रिक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून नोंदणी मुद्रांक विभागाचे अनेक उपक्रमांत संगणकीकरणाचे प्रमाण वाढले. विविध कामांसाठी ३५ प्रणाली कार्यान्वित आहेत. सॉफ्टवेअर विकास व देखभालीचा खर्च तसेच नेटवर्कवरील खर्च वाढला असून, त्या मनुष्यबळावरील खर्चामुळे संगणकीकरणाच्या खर्चात पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यासाठी यापूर्वी प्रतीपान वीस रुपयेप्रमाणे दस्त हाताळणी शुल्क शाकारण्यात येत होते. ते आता शासन निर्णयानुसार वाढवून चाळीस रुपये करण्यात आले आहे.
‘आय-सरिता’ सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल व त्याची चाचणी करण्याची कार्यवाही एनआयसीकडून करण्यात आली आहे. या शासन निर्णयाची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यात १७ एप्रिलपासून करण्यात येत असून या बदलाची जिल्हावासीय नागरिकांनी नोंद घ्यावी, – सुनील पाटील, सहजिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, जळगाव