Handicapped : नागपूर येथील समदृष्टी क्षमता विकास व विकास व अनुसंधान मंडळ (सक्षम) देवगिरी प्रांत, केशवस्मृती प्रतिष्ठान (जळगाव), जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, एस. आर. ट्रस्ट (मध्य प्रदेश) आणि एएल आयएमसीओ यांच्यातर्फे जिल्ह्यात १९ ते २९ एप्रिलदरम्यान दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात. पाय, कॅलिपर्स यांचे मोफत वितरण शिबिर होणार आहे. शिबिराची सुरुवात १९ एप्रिलला जामनेर येथून होणार आहे.
नागपूर येथील समदृष्टी क्षमता विकास व अनुसंधान मंडळ (सक्षम) २१ प्रकारच्या दिव्यांगांचे आरोग्य, पुनर्वसन, शिक्षण, रोजगार तसेच सामाजिक आणि राजकीय समरसता यावर काम करणारे एक राष्ट्रीय विचारांचे संघटन आहे. या संस्थेतर्फे जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात, पाय, कॅलिपर्स यांचे मोफत वितरण करण्यासाठी १९ ते २९ एप्रिलदरम्यान तालुकास्तरावर शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
अस्थिव्यंग, दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स तत्काळ वितरण करण्यात येणार आहेत. १९ एप्रिलला जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शिबिर होईल. २० एप्रिलला मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यातील लाभार्थीसाठी बोदवड येथील उजनी रस्त्यावरील गजानन महाराज मंदिरात, २१ एप्रिलला रावेर, यावल तालुक्यातील लाभार्थीसाठी फैजपूर येथे बसस्थानकाजवळील शुभ दिव्य सभागृहात, २२ एप्रिलला चोपडा येथे भगिनी मंडळाच्या महाविद्यालयात, २३ एप्रिलला चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या बसस्थानकाजवळील शिवाजी चौकातील कार्यालयात. २५ एप्रिलला जळगाव शहरातील केमिस्ट भवनात, तर २६ एप्रिलला भुसावळ येथील जळगाव रस्त्यावरील बाजपासजवळील ग्रामीण रुग्णालयात शिबिर होईल. २९ एप्रिलनंतर धुळे जिल्ह्यात शिबिराचे नियोजन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील शिबिरासंदर्भातील नियोजन दोन दिवसांत पूर्ण करून कळविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शिबिराचा लाभ आर्थोपेडिक दिव्यांग बांधवांनी घ्यावा, असे आवाहन ‘सक्षम’च्या येथील जिल्हाध्यक्षा मीनाक्षी निकम, ‘सक्षम’चे देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष तथा केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले आहे.