Yawal News : अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसंदर्भात होत असलेल्या तक्रारी पाहता एकाच दिवशी महसूल विभागाने कारवाईकरिता कंबर कसली व बामणोद येथे पाठलाग करीत वाळूचे डंपर, शहरात मातीचे डंपर तर नावरे गावाजवळ एक वाळूचे ट्रॅक्टर पकडले. ही कारवाई गुरुवारी दुपारपासून ते रात्रीदरम्यान करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईने उडाली खळबळ
मसाकाच्या आवारातून अवैध गौण खनिज माती उत्खननाची पाहणीदेखील करण्यात आली. फैजपूरजवळील मधुकर सहकारी साखर कारखाना आवारातून मोठ्या प्रमाणात गौण खनिज उत्खनन होत आहे व तेथून भरदिवसा डंपरव्दारे माती वाहतूक केली जात असल्याची तक्रार फैजपूरचे माजी नगराध्यक्ष नीलेश राणे यांनी केली होती. तक्रारीनंतर या जागेवर जाऊन प्रांताधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळाधिकारी रशीद तडवी यांनी पाहणी केली. गुरुवारी यावल शहरातून अवैधरीत्या माती वाहतूक करणारे डंपर (क्रमांक जी.जे. ०९ एक्स. ८४०६) महसूल पथकाला आढळून आले. डंपर चालकाकडे माती वाहतुकीचा परवाना नसल्याने ते डंपर यावल तहसील कार्यालयात जमा करून पंचनामा करण्यात आला. डंपरमालक शंकर कोळी यांना दंडासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.
बामणोद या गावाजवळ तुषार दशरथ फालक यांच्या मालकीचे डंपर (क्रमांक एम.एच.१९ झेड. ३१९१) याव्दारे अवैधरीत्या वाळू वाहतूक होत होती. वाहन चालकाने तहसीलदार यांचे वाहन पाहून डंपर पळवले. तहसीलदारांनी या वाहनास पाठलाग करून पकडले व ते फैजपूर पोलिसात जमा करण्यात आले. ही कारवाई नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळाधिकारी सचिन जगताप, तलाठी भरत वानखेडे, दंडगोळे, सुयोग पाटील, वाहन चालक अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली.
नावरे गावाजवळ ट्रॅक्टर पकडले
गुरुवारी दुपारी नावरे गावाजवळ अमोल रवींद्र माळी यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.१९-ई.जी. ७९३९) मधून अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात होती. मंडळाधिकारी सचिन जगताप, साकळी तलाठी संजय दंडगोले, मनवेल तलाठी विजय पाटील यांनी ट्रॅक्टर पकडले. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यावलला महसूल पथकाने पकडले अवैध पिवळी माती वाहतूक करणारे डंपर
यावल : शहरातील महसूल पथकाने यावलकडून फैजपूरकडे जाणारे अवैध पिवळी माती, गौण खनिज वाहतूक करणारे डंपर पकडले. ही कारवाई गुरुवारी (१७ एप्रिल) करण्यात आली. हे डंपर सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. यावल शहातून फैजपूरकडे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिवळी माती, गौण खनिज वाहतूक करताना डंपर (क्र.जी.जे. ०९ एक्स. ८४०६) महसूल पथकाला आढळले. डंपर चालकाकडे माती वाहतुकीचा परवाना नसल्याने ते डंपर यावल तहसील कार्यालयात जमा करून पंचनामा करण्यात आला. डंपर मालक शंकर कोळी यांना दंडसंदर्भात नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळाधिकारी सचिन जगताप, तलाठी भरत वानखेडे, दंडगोळे, सुयोग पाटील, वाहन चालक अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली.