जळगाव : अमेरिकी सरकारच्या टॅरीफच्या स्थगितीनंतर जगभरातील भांडवली बाजारांमध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झाली आहे. अमेरिका आणि चीन यांच्याकडून एकमेकांवर जास्तीत जास्त कर लावण्याचा सपाटा सुरु आहे. परिणामी सोन्याच्या किमतीने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने एक तोळा म्हणजे १० ग्रॅम सोन्याचा भाव सोमवारी सकाळी ९९ हजार ५०० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता जीएसटीसह एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी एक लाखांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
अमेरिका व चीनचा जो टेरिफोर सुरू असल्यामुळे मार्केट हे अनस्टेबल आहे. त्याचा इफेक्ट हा सोन्यावर पडत असून, सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. कंट्रीज व सेंट्रल बँक यांचीही इन्व्हेस्टमेंट वाढत आहे. त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर होत आहे. ग्राहक जरी असले, तरी ते सोने घेताना रोष व्यक्त करताना दिसत आहेत. मात्र, काही ग्राहक भाव वाढत्याने सोने मोड करतानाही दिसत आहेत. अमेरिका व चीन यांच्यात काही तडजोड झाली तर भाव कमी होण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्यांना न परवडणारा भाव
दुसरीकडे, लग्नसराईचे दिवस असून, सर्वसामान्यांना हा भाव न परवडणारा आहे. त्यामुळे घरात लग्नसराई कार्य पार पाडण्यासाठी हातमजुरांसह शेतकरी बांधवांना आपले घर अथवा शेती गहाण ठेवून, तसेच ठेवणीतले सोने मोडून कार्य पार पाडण्याची वेळ आली आहे.
कारण, सोन्याचे भाव हे सर्वसामान्यांना न परवडणारे असल्यामुळे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे आता आम्हाला आमची शेती अथवा घर गहाण ठेवून हे लग्नकार्य पार पाडावे लागत आहे. असे जळगावातील ग्राहक शोभा पाटील व सुनीता पाटील यांनी सांगितले.