जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ झाला असून, त्याचे चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास आले आहे, तर दुसरीकडे महामार्गावरील तरसोद ते पाळधी हा १८ किलोमीटरचा बाह्यवळण रस्त्याचे काम सध्या धीम्या गतीत सुरू आहे. रस्तेकाम ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत. कामावर स्वतः जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत. मात्र, धीम्या गतीने काम सुरू असल्याने, ते पूर्ण होईल का, असे प्रश्न जळगावकरांकडून उपस्थित केले जात आहेत.
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्तेकामाला वेग आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काही महिन्यांपूर्वी शहराबाहेरून जाणाऱ्या महामार्गाच्या कामाची पाहणी करीत बाह्यवळण रस्तेकामाला गती देण्याचे आदेश दिले होते. यात जिल्हाधिकाऱ्यांनी बाह्यवळण रस्त्याचे काम ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले होते. मात्र, अजूनही बाह्यवळण महामार्ग पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता नसल्याचेच दिसून येत आहे.
जिल्ह्यातील पाळधी ते तरसोददरम्यानच्या महामार्ग बाह्यवळण रस्ते विस्तारीकरणाचे काम इंदूर येथील अग्रोह इन्फ्रा कंपनीकडून करण्यात येत आहे. या बाह्यवळण रस्त्याचे एकूण १८ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण करण्यासाठी किमान २६ महिन्यांची मुदत देण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत (न्हाई) तयार करण्यात येऊन नव्याने बाह्यवळण रस्ता महामार्ग जळगाव शहराबाहेरून गेल्यास वाहतूककोंडीचा प्रश्न बऱ्याचअंशी सुटेल. महामार्गावर होणाऱ्या वारंवार अपघातांचे प्रमाणही त्यामुळे कमी करता येईल, असा अंदाज प्रशासनासह सर्वसामान्यांना होता. मात्र, प्रत्यक्षात पाळधी ते तरसोददरम्यानचे बाह्यवळण महाम ार्गाचे काम गेल्या वर्ष दीड वर्षात विविध कारणांनी रखडले. गेल्या सहा ते सात वर्षांपासून बाह्यवळण महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू आहे.
गिरणा नदीवरील मोठा पूल तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोहमार्गांवर आणि कानळदा, ममुराबाद, असोदा, तरसोद रस्त्यांवर मोठे उड्डाणपूल मंजूर आहेत. त्यापैकी गिरणा नदीवरील ३०० मीटरच्या पुलाचे तसेच इतर ठिकाणच्या सर्वच उड्डाणपुलांचे काम जवळपास पूर्ण झाल्याचे निदर्शनास आले आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील उड्डाणपुलावर महाकाय क्रेनच्या सहाय्याने नुकतेच गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता पश्चिम रेल्वेमार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे.
अधिकारी, कंत्राटदारांची कामाकडे दुर्लक्ष
राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळण रस्त्यावर अनेक लहान-मोठी गावे आहेत. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, ममुराबाद, शिवार, जळगाव शिवार, पाळधी शिवार आदींचा समावेश आहे. बाह्यवळण रस्त्यालगतच्या विविध भागांत उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. मात्र, अधिकारी, कंत्राटदार सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात, असा अनुभव वारंवार येत आहे. तरसोद ते पाळधीदरम्यान गिरणा नदीवरील पूल, असोद्यानजीकच्या रेल्वेरुळावरील उड्डाणपूल, पाळधीनजीकच्या रेल्वेपुलाचे काम, जळगाव- विदगाव – यावल रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम, तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाचे काम काहीअंशी अजूनही अपूर्ण आहे. गिरणा नदीवरील तीनशे मीटर पुलाच्या कामाची गती संथ आहे. अनेक भागांत बाह्यवळण रस्ता अद्याप कच्चा आहे. डांबरीकरण काही ठिकाणी होत असून, पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रस्तेकाम संथ; मुदतवाढ दिल्याचा परिणाम
कंत्राटदाराने मजुरांची संख्या वाढविली अन् रात्रंदिवस काम केल्यास काम मुदतीत पूर्ण होईल, असे चित्र तरी दिसून येत नसत्याची स्थिती आहे. गिरणा नदीच्या पुलानजीक मातीचा भराव टाकण्यात येऊन काम संथ गतीने सुरू असून, पूल आणि रस्तेकामाला अजून मुदतवाढ दिल्याने व काम रखडल्याचा प्रकार होईल, अशी स्थिती आहे. यासंदर्भात संबंधित राष्ट्रीय रस्तेविकास महामार्ग प्राधिकरणाचे प्रबंध संचालक शिवाजी पवार यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ऑनलाइन व्हीसी आणि बाहेरगावी बैठक असल्याचे सांगितले.
जातक कहरातील सोडवण्यासह अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी बाह्यवळण महामार्गाच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीचे नियोजन गॅन्ट चार्टच्या स्वरूपात तयार करण्यात आले आहे.
आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)