जळगाव : महापालिकेच्या जन्म, मृत्यू विभागात गेल्या तीन वर्षात तहसीलदारांचे २६४, तर न्यायालयाकडून ४२ असे दाखल्यांसाठी एकूण ३०६ आदेश मनपाला प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी तहसीलदारांकडील २३७दाखले संशयास्पद असून, ते पडताळणीसाठी तहसीलदारांकडे सोमवारी पाठविण्यात आले. आठवडाभरात त्याचा अहवाल महापालिकेला पाठविला जाणार आहे.
दरम्यान, यापूर्वी ५० पैकी ४३ आदेश बनावट आढळून आले आहेत. जन्म आणि मृत्यूच्या नोंदीसाठी तहसीलदारांचे बनावट आदेश तयार करणाऱ्या ४३ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
अन् बाल देखरेख संस्थांवर आता होणार कारवाई
जळगाव : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याबाबत समोर आले आहे. संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतचे समोर आले आहे.
महिला व बालविकास आयुक्तालयाने याची गंभीर दखल घेतली असून, अशा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था बाल देखरेख संस्था चालवण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
यासंदर्भात महिला व बालविकास आयुक्त नयना अर्जुन गुंडे यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे. ज्या व्यक्ती किंवा संस्था नोंदणी न करता बाल देखरेख संस्था चालवतील, त्यांना एक वर्षांपर्यंत कारावास किंवा एक लाख रुपयांपेक्षा कमी नसलेला दंड, किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे