Pahalgam Attack impact on IPL 2025: मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी निदर्शनं केली जात आहे. तसेच दहशतवाद्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, सध्याची स्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएल स्पर्धेदरम्यान चार मोठे निर्णय घेतले आहे. आज बुधवार (२३एप्रिल) रोजी आयपीएल २०२५ मधील ४१ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्यात बीसीसीआयने घेतलेले निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सामन्यात दिसणार आहे.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या या सामन्याआधी बीसीसीआयने दोन गोष्टीवर बंदी घातली आहे. एक म्हणजे सामन्यादरम्यान कोणतेही चीयरलीडर्स डान्स करताना दिसणार नाहीत. आणि दुसरं, सामन्यादरम्यान फटक्यांची आतषबाजी केली जाणार नाही.
बीसीसीआयने चीअरलीडर्स आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यावर बंद घालण्याव्यतिरिक्त दोन आणखी निर्णय घेतले आहे. एक म्हणजे दोन्ही संघांचे खेळाडू आणि सर्व पंच काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. तसेच या सामन्यापूर्वी दोन्ही संघ एका मिनिटाचं मौन ठेवतील.
महाराष्ट्रातील एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू
या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. यात डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेले आहेत.
आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या
जखमी झालेल्या एका महिलेने सांगितले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी नाव विचारले आणि हिंदू असल्याची ओळख पटल्यावर गोळीबार केला. अतिरेक्यांनी पर्यटकांना सुरुवातीला त्यांचे नाव विचारले तसेच हिंदू की, मुस्लिम असेही विचारले. हिंदू असलेल्या नागरिकांना लक्ष्य करीत त्यांनी गोळ्या झाडल्या.