जळगाव : कौटुंबिक वादातून पतीने दारूच्या नशेत पत्नीला पेटवून दिल्याची घटना बोदवडच्या हरणखेड येथे घडली. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हरणखेड, ता. बोदवड येथे ईश्वर कोंडीराम गवळी याने दारूच्या नशेत भांडण करीत पत्नी अश्विनी ईश्वर गवळी (२८) हीस मारहाण केली नंतर तिला पेटवून दिले. त्यात अश्विनी यांचे पोट, दोन्ही पाय तसेच हात भाजले गेले. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम मलकापूर व नंतर बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अश्विनी यांनी दिलेल्या जबाबावरून बोदवड पोलिस स्टेशनला २१ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यावर दोन तासांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील, पोकॉ. अतुल कुमावत, मोहन चौधरी यांनी केली. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
खूनप्रकरणी कोठडी
जळगाव : पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना धरणगावच्या विहीर फाट्यावर मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
२०१० मध्ये गोपाल सोमा मालचे यांनी ज्ञानेश्वर सावंत यांचा खून केल्याचा आरोप होता. त्यातून ते निर्दोष सुटले होते. मात्र ज्ञानेश्वर सावंत यांचा मुलगा व संशयित आरोपी राहुल याने वडिलांच्या खुनाचा राग मनात ठेवून गोपाल (वाकटूकी, ह. मु. करमुड, ता. चाळीसगाव) याचा विहीर फाट्यावर गावठी कट्टयाने कपाळाच्या मध्यमागी गोळी मारून खून केला होता. या प्रकरणी धरणगाव न्यायालयात राहुल सावंत याला हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.