जळगाव : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने जन्मदात्या मुलीवरच गोळी झाडून हत्या केली. ही ऑनर किलिंगची घटना शनिवार, २६ रोजी रात्री १०. ३० वाजेच्या सुमारास चोपडा शहरात घडली. यात सासऱ्यासह जावईही गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तृप्ती अविनाश वाघ (२४) असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (२८, दोघे रा. करवंद, शिरपूर, ह. मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. मात्र आरोपी सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा. जि. शिरपूर) याला हा विवाह पसंत नव्हता. दरम्यान, अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी नातेवाईकांकडील विवाह समारंभासाठी चोपड्यात आले होते.
धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या रोहिणी गावात रहिवासी असलेला सासरा किरण अर्जुन मंगले (४८, रा. शिरपूर) याने याची संधी साधत तृप्तीची गोळी झाडून हत्या केली. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोरासमोर आले. त्याच वेळी याने त्याच्याकडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तृप्तीला वाचविण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी असून, त्याच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर नातेवाइकांनी सासरा किरण मंगले यास मारहाण केल्याची तोही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.
जिल्ह्यात खळबळ
सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी आपल्या मुलीवर लग्नाच्या कार्यक्रमात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात मुलगी तृप्ती मांगले हिचा जागीच मृत्यू झाला असून जावई अविनाश वाघ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे.