जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन दिग्ग्ज नेते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत असून, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले होते. अशात पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे. त्यामुळे एकदा पराभवाला सामोरे जावे लागते की काय अशी परिस्थिती असल्याने, अनेक कार्यकर्त्यांना आपण सत्ताधारी पक्षात असायला हवे, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे दोन्ही दिग्ग्ज नेते हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होईल, असेही सांगितले जात आहे.
विचार विनिमय करून निर्णय घेणार – डॉ. सतीश पाटील
विरोधात असल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नाही, कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन आणि त्यांच्या समवेत विचार विनिमय करून याबाबत आपण निर्णय घेणार असल्याचं डॉ. सतीश पाटील यांनी म्हटल आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात या दोघंही दिग्ग्ज नेत्यांचं मोठं नेटवर्क आहे. या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला तर, ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मोठ खिंडार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर अजित पवार गटाला यातून मोठी ताकद मिळणार आहे.