जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून, शोभायात्रेतून पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने विरोध प्रदर्शनही करण्यात येणार आहे.
बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन तब्बल ४०० कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अहोरात्र परिश्रमाने गेल्या दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमाने शहरात उत्साही वातावरण आहे. यंदा भव्यदिव्य शोभायात्रा निघणार असून, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे धर्म विचारून २६ हिंदू बांधवांची हत्या करण्यात आली. निष्पाप पर्यटकांच्या निर्दयतेने झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जन्मोत्सव शोभायात्रेत काही बदल करण्यात आले आहेत.
शोभायात्रा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते शास्त्री टॉवरमार्गे नेहरू चौकापर्यंत निघणार आहे. शोभायात्रा खान्देश सेंट्रल लॉन्सवर पोहोचल्यानंतर समारोपावेळी प्रतिवर्ष अनुरूप परम पवित्र भगव्या ध्वजास ढोलवादनाने मानवंदना दिली जाईल. यानंतर भगवान परशुरामांची प्रार्थना होऊन हरिभक्त परायण दादामहाराज जोशी यांचे आशिर्वचनानंतर भगवान श्री परशुरामांची महाआरती होईल. त्यानंतर पाच हजार ज्ञाती बांधवांसाठी महाप्रसादाचे वाटप होईल. शोभायात्रेसह कार्यक्रमांना समाजातील बहुसंख्येने ज्ञाती बंधू-भगिनींनी एकजूट दाखवून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, अध्यक्ष वास्तुविशारद नितीन पारगावकर, महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव, प्रसिद्धिप्रम ख मनीष पात्रीकर, सचिव राजेश नाईक, सचिव अंजली हांडे यांनी केले आहे.
धर्म पूँछ कर मारा था, अब धर्म बताकर मारेंगे…
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे दरवर्षाप्रमाणे शोभायात्रा वाजतगाजत न निघता, ढोल-ताशे बंद ठेवून ‘ढोल नही अब तोफ बजेगी, प्रतिशोध की आग जलेगी’, ‘धर्म पूँछ कर मारा था, अब धर्म बताकर मारेंगे’ अशा नामफलकांसह घोषणा देत, हजारोंच्या संख्येने काळी फित बांधून, हातात निषेध फलके घेऊन शोभायात्रा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते शास्त्री टॉवरमार्गे नेहरू चौकापर्यंत निघेल.