---Advertisement---

Dhule News : धुळ्यात एचटीबीटी कापूस बियाणे विकणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनातर्फे कारवाईची तयारी

---Advertisement---

Dhule News : जिल्ह्यातील कोणत्याही बियाणे विक्रेत्यामार्फत अनधिकृत बियाण्यांची विक्री होणार नाही तसेच एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री झाल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी कापसाची लागवड १ जूननंतर करण्याबाबत प्रबोधन करावे, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जिल्हा परिषदेचे समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी सीताराम चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, कृषी उपसंचालक प्रज्ञा पवार, मोहीम अधिकारी प्रदीप निकम, जिल्हा कृषी अधिकारी भास्कर जाधव, जिल्हा कृषिनिविष्ठा असोसिएशनचे मानसिंग गिरासे, साहेबचंद जैन, सुनील चितोडकर, गौरव अग्रवाल यांच्यासह तालुकास्तरीय कृषी अधिकारी, इफको. आरसीएफ, जीएसएफसी, कोरोमंडल, आयपीएल, अजित सीड्स, राशी सीड्स, कावेरी सीड्स न्युजिवुड सीड्स व तुलसी सीड्सचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशक निविष्ठा सुरळीतपणे, वेळेवर व रास्त किमतीत शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाण्याची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत जिल्ह्यात कार्यरत सर्व बियाणे निरीक्षकांनी सतर्क राहावे. जिल्ह्यात कोणत्याही बियाणे विक्रेत्यांमार्फत अनधिकृत बियाण्याची विक्री होणार नाही याची खबरदारी बियाणे विक्रेत्यांनी घ्यावी. जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाणेची विक्री झाल्याचे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यान्वये कठोर कारवाई करावी. गुलाबी बोंडअळी प्रतिबंध करण्यासाठी शासनाच्या वेळापत्रकानुसार कापूस बियाण्याची विक्री होईल याची दक्षता विक्रेते व कंपन्यांनी घ्यावी. तसेच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड १ जूननंतर करण्याबाबत प्रबोधन करावे. शेतकऱ्यांना निविष्ठांची विक्री करताना वेठीस धरू नये, निकृष्ट निविष्ठांची विक्री करू नये, गुणवत्तापूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होण्यासाठी विक्रेते व अधिका-यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिल्या. मोहीम अधिकारी प्रदीप निकम यांनी आभार मानले.

यंदा ३२ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

कृषी विकास अधिकारी चौधरी यांनी जिल्हास्तरीय कृषिनिविष्ठा संनियंत्रण समितीची रचना, समितीची कार्यकक्षा याबाबत माहिती देताना सांगितले की, खरीप हंगाम २०२५ साठी ३२ हजार १४६ क्विंटल बियाण्यांची मागणी असून, त्यानुसार विविध बियाणे उत्पादक कंपनीकडून या हंगामात पुरवठा होणार असल्याचे सांगितले. खरीप हंगाम २०२५ साठी कापूस बियाण्यांची ११ लाख एक हजार ९१६ पाकिटांची मागणी केली आहे.

जिल्ह्यासाठी खतांचे लाखावर टनांचे आवंटन

जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी कृषी आयुक्तालयाने सुमारे एक लाख सात हजार २०७ मेट्रिक टनांचे आवंटन देण्यात आले असून, सद्यःस्थितीत ५० हजार ६७७ मेट्रिक टन रासायनिक खतसाठा उपलब्ध आहे. शासनाने श्रीया खताचा ३,५०० मेट्रिक टन व डीएपी खताचा ३०० मेट्रिक टन संरक्षित साठा कृषी उद्योग व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ या संस्थेमार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तक्रार असल्यास संपर्क साधा

रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशकांबाबत काही तक्रार असल्यास शेतकन्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment