Crime News : किरकोळ कारणावरून निवृत्त फौजी व त्याच्या पत्नीने एका महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. तिचे केस धरून लोखंडी गेटवर आदळले, त्यानंतर तिच्या गुप्तांगावर लाथा मारत अंगाला स्पर्श केला. हा प्रकार ३० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता बीडच्या धानोरा रोड परिसरात घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १ मे रोजी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेच्या नातेवाईकांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून आरोपी अटकेची मागणी केली. पुष्पा खेडकर व वसंत खेडकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडिता ही राज्य परिवहन महामंडळात नोकरीला आहे. मागील काही दिवसांपासून कचरा टाकण्यासह इतर किरकोळ कारणावरून खेडकर दाम्पत्य पीडितेच्या कुटुंबाला त्रास देत होते. ३० एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास पीडिता या नोकरीवरून घरी आल्या. त्यानंतर खेडकर हा घरासमोर उभा राहून आरडाओरडा करत असल्याचे पीडितेला मुलांनी सांगितले.
पीडिता बाहेर येताच त्यांनाही शिवीगाळ केली. तिच्या मुलांना अंगावर गाडी घालतो, असे म्हणताच पीडितेने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावर खेडकर याने तिच्या केसाला धरून लोखंडी गेटला डोके आदळले. त्यानंतर गुप्तांगावर लाथा मारल्या. पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर लोकांनी धाव घेत हे भांडण सोडविले. तर पीडिता बेशुद्ध पडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मोबाइलसह दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल
धुळे : शहरातील चाळीसगावरोड पोलिसांनी मोबाइलसह दुचाकी चोरी अशा दोन्ही गुन्ह्यांचा छडा लावला. कारवाईत संशयित आरोपीकडून दुचाकीसह दोन मोबाइल आणि रोकड, असा एकूण ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९ एप्रिल रोजी रात्री फिर्यादी नेहा भटू कदम (वय २७, रा. चाळीसगावरोड, धुळे) या नरेंद्र चौकातून पायी येत असताना दोन दुचाकीस्वारांनी फिर्यादीस धक्का देऊन त्यांच्या हातातून २६ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. दुस-या एका गुन्ह्यात दि. १ मे रोजी अग्रवालनगर येथून फिर्यादी संजय गजानन देवरे (४९, रा. हरिओमनगर मोराणे, धुळे) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बी ४५९९) लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही दाखल गुन्ह्यांच्या तपासाला गती देऊन शोधपथकाने संशयित आरोपी रेहान ऊर्फ पोपण्या फरीद पठाण (१९, रा. अंबिकानगर, पत्रेवाली मस्जिदजवळ, धुळे) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून ४२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल, १ हजार १०० रुपये रोकडसह ३० हजार रुपये किमतीची चोरी केलेली दुचाकी असा एकूण ७३ हजार ९९ रुपये किमतीची मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चाळीसगावरोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश घुसर, उपनिरीक्षक हरिश्चंद्र पाटील, हवालदार सुनील पाथरवट, शोएब बेग, अतिक शेख, विनोद पाठक, सचिन पाटील, सिराज खाटिक, मनोज भामरे, संदीप वाघ यांनी केली आहे.