HSC Result 2025 : बारावीच्या परीक्षेत समाधानकारक गुण पडले नाहीत, अशा मानसिकतेच्या नैराशातून बारावीच्या दोन विद्यार्थ्यानी सोमवारी (५ मे) दुपारी आत्महत्या करत जीवनयात्रा संपविल्याच्या हृदयद्रावक घटना जिल्ह्यात घडल्या. ऋषिकेश दिनेश पाटील (वय १८, रा. ममुराबाद) तसेच भावेश प्रकाश महाजन (वय १९, रा. एरंडोल) असे मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. भावेश हा पाचोरा येथे त्याच्या बहिणीकडे आलेला होता. घरात कोणी नसताना त्याने तेथे टोकाचा निर्णय घेतला. या दोन्ही घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली.
ऋषिकेश कुटुंबासह ममुराबाद येथे वास्तव्यास होता. विज्ञान शाखेतून त्याने बारावीची परीक्षा दिली होती. सोमवारी दुपारी बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ऋषिकेश हा ४९ टक्के गुण घेत उत्तीर्ण झाला. गुण कमी मिळाले, अशा मानसिकेतून
ऋषिकेश हा नैराशात आला. निकाल कळाल्यानंतर दुपारी ऋषिकेश घरी आला. कुटुंबातील कोणी सदस्य घरात नसत्याची संधी हेरत तो दुसऱ्या मजल्यावर खाना झाला. याठिकाणी गळफास घेत त्याने टोकाचा निर्णय घेतला. हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात येताच त्या निशब्द होऊन शोकमग्न झाल्या. शेजारील लोकांनी धाव घेत बेशुद्धावस्थेतील ऋषिकेशला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. ग्रामस्थांसह ऋषिकेशच्या अनेक मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही वार्ता धडकताच ममुराबाद येथे शोककळा पसरली आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेतकरी कुटुंबावर आघात
ऋषिकेश याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जोडधंदा म्हणून ते रसवंतीही चालवितात. त्याचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बारावी परीक्षेत चांगले मार्क मि ळाल्यानंतर मोठ्या महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा संकल्प ऋषिकेशने केला होता. मात्र समाधानकारक निकाल लागला नाही. त्यातून तो नैराशात येऊन त्याने टोकाचा निर्णय घेतला असावा, असा संशय त्याच्या मित्रांच्या चर्चेतून व्यक्त झाला.
भावेशने हेरली संधी
भावेश हा एरंडोल येथील डी.डी. एस.पी. महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता. त्याने बारावीची परीक्षा
दिलेली होती. एरंडोल येथील पाताळ नगरीतील रहिवासी तथा भावेश याचे काका प्रकाश रतन महाजन हे पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी भावेश याला दत्तक घेतले होते. महाविद्यालयास उन्हाळी सुटी असल्याने भावेश हा पाचोरा येथील बहिणीकडे आला होता.
नातेवाईकांकडे पुणे येथे लग्न समारंभ होता. या विवाहाला उपस्थित राहण्यासाठी रविवारी (४ मे) भावेश याचे पाचोरा येथील मेहुणे तसेच त्याची बहिण असे दोघे जण पुणे येथे रवाना झाले. त्यामुळे घरी भावेश हाच होता. सोमवारी सकाळी दहाला भावेश हा पाचोऱ्यातील त्याच्या दुसऱ्या मेव्हण्याच्या दुकानावर गेला होता. दुपारी दुकान बंद करुन भावेश हा बहिणीच्या घराकडे रवाना झाला. दरम्यान सोमवारी दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत भावेश हा ४२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. कमी गुण मिळाल्याच्या नैराशातून त्याने गावी गेलेल्या बहिणीच्या घरीच गळफास घेत आत्महत्या केली.
दरम्यान, पाचोऱ्यात भावेश याची अन्य बहिण वास्तव्य करते. तिच्याकडे तो जेवणाला जाणार होता. बराच उशीर झाल्यानंतरही तो जेवणासाठी घरी न आल्याने त्याच्या बहिणीने भावेश याला मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांना काही एक प्रतिसाद मिळाला नाही. बहिणीच्या घरी तपास केला असता भावेश याने गळफास घेतल्याची घटना समोर आली. ही वार्ता कळताच पाचोरा आणि एरंडोल येथील नातेवाईकांना जबरधक्का बसला. दोन्ही गावात शोककळा पसरली.
वडिलांचे अकस्मात निधन
भावेश याचे वडील प्रकाश महाजन यांचे हृदयविकाराने सहा महिन्यांपूर्वी निधन झाले होते. भावेश याच्या टोकाच्या निर्णयाने पाचोरा तसेच एरंडोल येथे हळहळ व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी पाचोरा तसेच जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.