नंदुरबार : लग्नाचे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकाविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव शशिकांत खरात (३८, रा. शहादा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, गौरव खरात याने एका ३६ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केले. नंदुरबारातील कोकणी हिल, सूरत येथील खासगी फ्लॅट येथे वेळोवेळी घेऊन जात अत्याचार केले. २०२१ पासून हा प्रकार सुरू होता, नंतर गौरव याने महिलेशी लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने नंदुरबार शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून गौरव खरातविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे करत आहेत.
सिव्हिल कर्मचारी वसाहतीत एकाच रात्री चार घरे फोडली
नंदुरबार : जिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी चारही ठिकाणांहून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील याच वसाहतीत अशा प्रकारची घटना घडली होती.
पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबारातील जिल्हा रुग्णालय परिसरात कर्मचाऱ्यांची वसाहत अर्थात अपार्टमेंट आहे. गोमाई बिल्डिंगमध्ये असलेल्या घरांपैकी चार घरे चोरट्यांनी फोडली. यात गणेश जगदीश मराठे यांच्या घरातून १० हजार रुपये रोख, १५ हजार ५०० रुपये किमतीचे दागिने असा एकूण २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, रितू संजय महाजन यांच्या घरातून पाच हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचे चांदीचे दागिने, रुतिला गावित यांच्या घरातून तीन हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, कोमल देवानंद सोहिते यांच्या घरातून १५ हजार ८०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
याबाबत गणेश मराठे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार जयसिंग गावित करीत आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या याच अपार्टमेंटमध्ये यापूर्वी देखील चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.