जळगाव : “शेतकऱ्यांचे पीक १०० टक्के उद्ध्वस्त झाले असून, विमा कंपन्यांनी डबल सर्व्हेच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नये,” असा स्पष्ट इशारा राज्याचे पाणीपुरवठा व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
दरम्यान, “हंगामात नुकसान होऊनही एखादा पात्र कर्जदार शेतकरी विमा संरक्षणाखाली नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार ठरेल,” असा इशारा केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिला.
जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे ७२३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये जळगाव तालुक्यात १५०० हेक्टर, चोपड्यात १०००, चाळीसगावमध्ये ७२३ आणि यावल तालुक्यात ४५० हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे.
पालकमंत्री पाटील यांनी गुरुवारी वादळग्रस्त भागातील शेतीची पाहणी करून नियोजन भवनात आढावा घेतला. यावेळी खा. स्मिता वाघ, आ. राजू भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते.
आतापर्यंत ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी नोंद केली असून, उर्वरित शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत ‘१४४४७’ या क्रमांकावर जिओ टॅगिंगसह फोटो पाठवून नोंद करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“कांद्या बाग, मिरग्या बाग असा उल्लेख टाळावा. एकदा केळीचे खोड वादळाने हलले की पुन्हा उत्पादन होत नाही, हे विमा कंपन्यांनी समजून घ्यावे,” असेही पालकमंत्र्यांनी बजावले. “सर्व्हर डाऊन असेल, तर ऑफलाइन नोंदी घ्या पण शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवा,” असेही ते म्हणाले.
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितले की, सर्व पात्र कर्जदार शेतकऱ्यांना विमा संरक्षणात समाविष्ट करणे बँकांना बंधनकारक आहे. “पीक हंगामात नुकसान झाले आणि शेतकऱ्याला विमा संरक्षण नसेल, तर संबंधित बँक व शाखा नुकसान भरपाईस जबाबदार असतील,” असेही त्यांनी स्पष्ट केले.