नंदुरबार : पती व सासूच्या ज्याचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. अशीच एक नंदुरबार तालुक्यात समोर आलीय, जिथे विवाहितेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासूविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, ममता गणेश हरदास (वय २५), विद्या गणेश हरदास (वय ४) आणि साई गणेश हरदास (वय २) असे मयत तिघांचे नाव आहे. नंदुरबार तालुक्यातील वावद येथे ममता या पती गणेश प्रकाश हरदास व सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास यांच्यासह वास्तव्याला होत्या.
दरम्यान, ममता यांनी ९ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावारातील एका विहिरीत आपल्या दोन मुलांसह उडी घेतली. हा प्रकार लक्षात येताच ग्रामस्थांनी तात्काळ तिघांना बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिघांना मृत घोषित केले. याप्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पती व सासूवर छळाचा आरोप
दुचाकी घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे, यासाठी ममता हीचा पती गणेश व सासू मुक्ताबाई हे सतत छळ करत होते. या छळाला कंटाळून ममताने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली, अशी फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिली. या फिर्यादीवरून पती गणेश प्रकाश हरदास व सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.