जळगाव : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर धारदार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. ११ रोजी दीड वाजेच्या सुमारास राजीव गांधी नगरात घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजीव गांधी नगरात संगिता रमेश झेंडे (वय ५०) हे वास्तव्यास आहेत. ११ मे रोजी दुपारच्या सुमारास संगीता झेंडे यांचे पती रमेश बाबासाहेब झेंडे यांनी नशा करण्यासाठी पैसे मागितले. परंतु पत्नीने पैसे न दिल्याचा राग आल्याने रमेश झेंडे यांनी लाकडी दांडक्यासह कोयत्याने पत्नीवर वार करीत गंभीर जखमी केले. संगीता झेंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. हवालदार प्रवीण जगदाळे तपास करीत आहेत.
झारा डोक्यात मारल्याने तरुण जखमी
पानटपरीवर मोबाइल चार्जिंगला लावण्यासाठी गेलेल्या मुलाला चोर म्हटल्याचा जाब विचारल्याने विशाल भाऊसाहेब मोरे (३०, रा. गेंदालाल मिल) यांच्या डोक्यात थेट भजे तळण्याचा झारा मारला. ही घटना ११ मे रोजी रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी विशाल मोरे यांचा मुलगा ११ मे रोजी रात्री रेल्वेस्थानक परिसरातील एक पानटपरीवर मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेला असता तेथे त्याला तुम्ही चोर आहे, असे दोन जणांनी म्हटले. त्याविषयी मोरे यांनी जाब विचारला. त्याचा राग आल्याने दोन जणांनी त्यांना शिवीगाळ करीत भजे तळण्याचा झारा डोक्यात मारला. यामुळे मोरे यांना दुखापत झाली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा अपघातात महिला जखमी
पुढे जाणाऱ्या रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्यामागे असलेली कारही थांबल्याने त्यावर मागून येणारी एक चारचाकी वाहन धडकले. या अपघातात रिक्षामधील खैरुननाज इरफान भिस्ती (२४, रा. शाहूनगर) या जखमी झाल्या. हा अपघात ११ मे रोजी रात्री नेहरू चौक ते रेल्वे स्थानकदरम्यान झाला. याप्रकरणी कारचालक शिवाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध १२ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.