जळगाव : जळगाव जिल्ह्यात गत सप्ताहात बेमोसमी पावसाने थैमान घातले होते. यात सुमारे सहा हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतपिकांना फटका बसला होता. याचे पंचनामे होत नाहीत तोच, शुक्रवारपासून पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरूवातीलाच तप्त उन्हाचा तडाखा असतानाच गत सप्ताहात बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. यात रब्बी हंगामातील केळी बागायती पिकांसह ज्वारी, बाजरी, मका आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
या नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार स्मिता वाघ, तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी आदी अधिकाऱ्यांनी करीत पंचनामे करण्यास सुरवात करण्यात आली आहे. मात्र याचे पंचनामे होत नाहीत तोच, शुक्रवारपासून पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.
दरम्यान, आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दि.१५ पासून पावसाची शक्यता वर्तविली आहे. तर दि.१६ पासून गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. एकीकडे पावसाची शक्यता असतानाच दि.१५ पासून तापमानाचा पारा ३९ वरुन ४० अंशावर जाणार आहे. त्यामुळे वातावरणातील आद्रता वाढणार असल्याने उकाडा असह्य ठरणार आहे.