जळगाव : जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका सेवेत कार्यरत असलेल्या वाहनचालकांनी ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती आदेश देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शासकीय 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटना संलग्न शासकीय रुग्णवाहिका कंत्राटी वाहन चालक संघटना नागपूर विभागातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदनजिल्हा आरोग्य अधिकारी यांना सोमवारी (१९ मे ) देण्यात आले. यासह औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या वाहनचालकांना लेखाशीर्ष 22105041/10 (कंत्राटी) अंतर्गत वेतन देण्यात यावे, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
धुळे जिल्हा परिषदेने 16 मे 2025 रोजी पत्र क्रमांक 2273/25 अन्वये अशा स्वरूपाची नियुक्ती आदेश देऊन वेतनाची तरतूद केली आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रातील अन्य जिल्हा परिषदांनी ठेकेदारी पद्धतीने कोणत्याही वाहनचालकांना नियुक्ती आदेश दिलेले नाहीत. न्यायालयीन प्रकरणांतील वाहनचालकांनाही ठेकेदारी पद्धतीने आदेश देण्यात आलेले नाहीत.
जळगाव जिल्ह्यातील काही वाहनचालक सध्या 185 हेड अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असून, त्यांना आरोग्य आयुक्तांच्या आदेशानुसार काम दिले गेले आहे. 8 मे 2025 रोजी आरोग्य भवन मुंबई येथे यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे विनंती केली आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत कोणत्याही ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती आदेश दिले जाऊ नयेत. वाहनचालकांनी सांगितले आहे की, ते ठेकेदारी पद्धतीने नियुक्ती आदेश घेणार नाहीत. त्यामुळे लेखाशीर्ष 22105041/10 अंतर्गत नियुक्ती आदेश व वेतन देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देतांना कुणाल कोळी, रमेश गोसावी , सलीम पटेल, संतोष लोंढे आदी उपस्थित होते.