नंदुरबार : गुजरातमध्ये जाणारा ८५६ क्विंटल रेशनचा तांदूळ विसरवाडीनजीक एलसीबीने जप्त केला. एकूण तीन मालट्रकांसह ५३ लाख ७६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिन्ही मालट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, छत्रपती संभाजीनगर भागातून रेशनचा माल गुजरातमध्ये काळ्या बाजारात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार धुळे-सुरत महामार्गावर एलसीबीच्या पथकाने पाळत ठेवली. त्यानुसार तीन मालट्रक या रस्त्याने जात असताना विसरवाडीजवळ त्यांना थांबविले.
यात मालट्रक (एमएच २३ एयू ९९००) वरील चालक अमोल प्रल्हाद गिरे, रा. डोयफळवाडी, ता. गेवराई, दुसरा मालट्रक (एमएच १८ बीजी १९११) वरील चालक रावसाहेब फकिरराव दिघोळे (रा. निंभोरा, ता. कन्नड) व तिसरा मालट्रक (एमएच २० ईएल ९६९२) वरील चालक सचिन बाळासाहेब पवार (रा. खातखेडा, ता. कन्नड) यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन मालट्रकमध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
संबंधित मालट्रक हे ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक वसीम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांचे असल्याचे सांगितले. यात असलेला माल गुजरातमध्ये जात असल्याचेही स्पष्ट केले. पोलिसांनी आतमध्ये तपासणी केली असता त्यात तांदूळ आढळून आला. त्याबाबत पावत्या मालट्रकमध्ये असलेल्या गोण्यांमध्ये तांदूळ होता. गोण्यांवर कुठलाही शिक्का नाही किंवा कंपनीने नाव नसल्याने तांदूळ रेशनचा असल्याचा संशय पथकाला आला.
तिन्ही मालट्रक ताब्यात घेऊन तांदळाची मोजणी केली असता त्यात ८५६ क्विंटल तांदूळ आढळून आला. तो रेशनचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एकूण ८५६ क्विंटल तांदूळ व वाहन असा एकूण ५३ लाख ७६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन्ही चालकांविरुद्ध विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासल्या असता त्या आढळून आल्या नाहीत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार राकेश वसावे, जितेंद्र तांबोळी, बापू बागुल, जितेंद्र तोरवणे, राजेंद्र काटके यांनी केली.