संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात् डीआरडीओ सध्या एका अशा स्वदेशी क्षेपणास्त्रावर काम करीत आहे, जे भविष्यात भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या ब्रह्मोस या शक्तिशाली क्षेपणास्त्राची जागा घेऊ शकते. या क्षेपणास्त्राचे नाव ‘स्टार.’ हे क्षेपणास्त्र विकासाच्या तिसऱ्या टप्प्यात असून, हा त्याचा अंतिम टप्पा असल्याचे डीआरडीओच्या सूत्रांनी सांगितले.
त्याच्या काही महत्त्वाच्या चाचण्याही घेण्यात आल्या असून, त्या यशस्वी ठरल्या आहेत. ताशी ३०६२ किमी वेगाने या क्षेपणास्त्राची मारक क्षमता राहणार आहे. विकासाच्या या तिसन्या टप्प्यात डीआरडीओचे अभियंते क्षेपणास्त्राच्या सर्व भागांना जसे, इंजिन, नेव्हिगेशन प्रणाली आणि नियंत्रण प्रणालीला एकत्र जोडत असतात. नंतर युद्धासारखी स्थिती निर्माण करून त्या क्षेपणास्त्राच्या अनेक चाचण्या घेतल्या जातात. यातून अचूक मारा करण्याची त्याची क्षमता आणि प्रभाव याची कल्पना येत असते.
या चाचण्यांमधून उपलब्ध होणाऱ्या माहितीतून ते अधिक अत्याधुनिक केले जाते, जेणेकरून युद्धासारख्या स्थितीत त्याचा प्रभावी वापर करता येईल. सध्या डीआरडीओ वेगवेगळ्या वातावरणात आणि परिस्थितींमध्ये या क्षेपणास्त्राचे परीक्षण घेत आहे. या अंतर्गत हे क्षेपणास्त्र जमीन आणि हवाई उपकरणांसोबत व्यवस्थित काम करीत आहे की, याचा अभ्यास केला जात आहे. या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्यानंतर डीआरडीओ या क्षेपणास्त्राचे मर्यादित स्वरूपात उत्पादन करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
तिन्ही दलांसाठी उपयुक्त
हे एक स्वदेशी क्षेपणास्त्र असून, यामुळे हवाई दल, लष्कर आणि नौदलाची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. सध्याच्या टप्प्यात देशाचे हे तिन्ही सशस्त्र दल या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून लक्ष्याचा अचूक भेद करण्याचा सराव करू शकतात. हे क्षेपणास्त्र स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केले जात असत्याने ते किमतीच्या तुलनेत स्वस्त असून, भविष्यात ते ब्रह्मोससारख्या क्षेपणास्त्रांसाठी पर्याय ठरू शकते, असे सूत्रांनी सांगितले.